(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे २१ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील रस्ते चकाचक करण्याचे काम सुरू असून जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांची साफसपाई, काँक्रिटीकरणावरील रस्त्यांमधील पॅच भरणे, दुभाजकावरील झाडी कापणे, अशी कामे अचानकपणे सुरू झाल्याने नागरीकांनाही आश्चर्याचा धक्का बसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यांचे दोन उपमुख्यमंत्री शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांवरून जाणार आहेत. त्या रस्त्याची रंगरंगोटीसह डांगडुजीला सुरुवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून सज्जतेचे कामकाज सुरु आहे. परंतु या सुरू असलेल्या कामाबाबत काही नागरीकांना उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याची कल्पना असल्यामुळे त्या निमित्ताने तरी रस्त्यांची डागडुजी, रस्ते चकाचक, दुभाजकांच्या झाडांची साफसफाई अशा अनेक कामांमध्ये प्रशासन कामाला लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय किंवा राज्यातील मंत्री महोदयांचा शहरात दौरा असला की प्रशासन त्या-त्या मार्गावरील खड्डे केवळ बुजविते. बाकी ठिकाणी परिस्थिती जैसे थे असते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री हे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेताच, केवळ राजकीय नेत्यांनाच खड्ड्यांचा त्रास होतो का ? सामान्य नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाला दिसत नाही का ? असा सवाल सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.