(राजापूर/प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला न घाबरता उत्साही वातावरणात परीक्षा द्यायला हवी व स्वत:च्या तयारीवर विश्वास ठेवायला हवा, असा संदेश दिला.
जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ‘परीक्षा पे चर्चा 2022′ या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी दूरदर्शन चॅनेलच्या माध्यमातून संवाद साधला.
या कार्यक्रमामध्ये नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील व विद्यार्थ्यांशी ऑनलाईन व ऑफलाईन संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मार्गदर्शन केले.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या सत्राचा आनंद लुटला आणि परीक्षेची चिंता दूर केली आणि आगामी बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षांना कोणतीही चिंता न करता निवांतपणे सामोरे जाण्याची मनाची तयारी केली. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेले विचार व मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून ते आचरणात आणण्याचा संकल्प केला आहे.
पडवे येथील नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी उदयशंकर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला प्राचार्या श्रीमती उदयशंकर, यांच्यासह उपप्राचार्य मनोज पावस्कर तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.