(चिपळूण)
येथील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात काल, शुक्रवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. सिद्धांत प्रदीप घाणेकर या विद्यार्थ्यांचा चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या ढिगाराखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थी सिद्धांत प्रदीप घाणेकर मूळचा दापोली देगाव येथील रहिवासी आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत डिबीजे महाविद्यालयाच्या आवारात महामार्ग लगतच संरक्षित भिंत उभारण्यात आली होती. त्या आरसीसी संरक्षक भिंतीवर आणखी जांभ्या स्वरूपाची संरक्षक भिंत डीबीजे महाविद्यालयाने उभारली होती. जांभ्याच्या संरक्षक भिंतीचे काही दगड शुक्रवारी सकाळी अचानक कोसळले. किरकोळ घटना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु संबंधित विद्यार्थी हा महाविद्यालयातून सायंकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू होती. शनिवारी सकाळी तो भिंतीखाली चिरडून मृत झाल्याची घटना उघडकीस आली.
चिपळूण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गजवळ असलेली काँक्रिटची संरक्षक भिंत जांभ्या दगडाची बांधण्यात आली होती. ही भिंत कोसळून हा मोठा अपघात झाला. दुर्दैवाने याच भिंतीलागत एक टपरी आहे. या टपरीवर सिद्धांत उभा होता, त्यावेळी ही भिंत कोसळली आणि सिद्धांत हा या भिंतीखाली गाडला गेला असल्याचा अंदाज लावला जात आहे.
सिद्धांत याचा एक भाऊ ओंकार सैन्यातमध्ये दाखल आहे. घाणेकर कुटुंब हे मूळचं दापोली तालुक्यातील देगाव येथील आहे. कॉम्प्युटर सायन्स या विषयातील आवड असल्याने सिद्धांतने चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घेतला होता. तो या विषयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सिद्धांत याच्या दुर्दैवी मृत्यूने दापोली तालुक्यात वाकवली देगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धांत हा खेड तालुक्यात लोटे येथे आपल्या मामाकडे राहून आपलं शिक्षण चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात पूर्ण करत होता.