(संगमेश्वर)
देवरुख नगरपंचायत हद्दीत काही भागात रस्त्याला खड्डे पडले आहेत. तसेच काही भागात नळपाणी देताना खोदलेले चर आता खड्ड्यात रुपांतरित झाले आहेत. त्यामुळे हे चर आता नागरिकांसाठी धोकादायक ठरले आहेत.
नगरपंचायतीजवळच मातृमंदिर नजीकच्या चौकात पावसामुळे डांबराने बुजवलेले खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत. याच मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर नळपाणीसाठी चर खोदण्यात आले आहेत. या चरांची पुन्हा रुंदी वाढल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. तसेच भूमी अभिलेख कार्यालयाजवळ मोठे दोन खड्डे पडले आहेत. मात्र, खड्डे आणि चराच्या दुरुस्तीकडे नगर पंचायत आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
देवरुख-साखरपा-संगमेश्वर मार्गासाठी बांधकाम विभागाकडून निधी खर्च पडूनही रस्त्याची, गटारांची कामे पूर्ण झालेली नाहीत. यासाठी अनेक संस्था, संघटनांनी पाठपुरावा केला तरी काही फरक पडलेला नाही. या अपुऱ्या कामाकडे नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.