(रत्नागिरी)
पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच सागरी जिल्ह्यांमध्ये पाच अत्याधुनिक फायबर स्पीड बोट तैनात होणार आहे. रत्नागिरी मत्स्य विभागात १ ऑगस्ट रोजी ही स्पीड बोट दाखल होणार आहे.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर १ ऑगस्टपासून यांत्रिकी मासेमारीला सुरुवात होणार आहे. या काळात कुठल्याही प्रकारची अनधिकृत मासेमारी होऊ नये याची दक्षता फायबर स्पीड बोटद्वारे घेतली जाणार आहे. यापूर्वी भाडेतत्त्वावर लाकडी नौका ट्रॉलर्स गस्तीसाठी वापरण्यात येत होत्या. मात्र, त्यांना पुरेसा वेग मिळत नव्हता. त्यामुळे शासनाने आता सर्व सागरी जिल्ह्यांमध्ये फायबर स्पीड बोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पीड बोटीच्या आधारे अवैध मासेमारीवर नियंत्रण आणणे शक्य होणार असल्याचा दावा मत्स्य विभागाकडून केला जात आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर मच्छीमारी होऊ नये म्हणून ही स्पीड बोट १ ऑगस्टपासून रुजू होईल. सध्या बंदी कालावधी असल्याने गस्ती नौका समुद्रात जात नाहीत. १ ऑगस्टपासून गस्ती नौकेचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल आणि अवैध मासेमारीला आळा घालता येईल, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.