(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील वालोपे देवूवाडी येथे 29 एप्रिल 2017 रोजी सासूने सुनेवर चाकूने तब्बल 36 सपासप वार करुन खून केल्याची घटना घडली होती. चार वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल देत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सासूला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रेणुका नामदेव करकाळे (55, उदगिरी, लातूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. तर परी करकाळे (वय 25) असे मृत सुनेचे नाव आहे.
करकाळे कुटुंब हे काही वर्षापूर्वी चिपळूणात वास्तव्याला आले होते. सासू व सूनेचे घरातील किरकोळ कारणातून वाद होत होते. 29 एप्रिल 2017 रोजी दोघींच्या जोरदार वाद झाला. या वादातून सासू रेणुका हिने सुनेवर चाकूने तब्बल 36 वार करुन तिचा खून केला. या घटनेची माहिती परीचा मुलगा ओम याने शेजार्यांना दिली. या घटनेने चिपळूण तालुका हादरला होता.
या घटनेची माहिती वालोपेचे पोलीस पाटील बाळकृष्ण कदम यांनी चिपळूण पोलिसांना दिली होती. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह हेडकॉन्स्टेबल विनायक चव्हाण, महिला हेडकॉन्स्टेबल वेदा मोरे यांनी केला. त्यानुसार पोलिसांनी सासू रेणुका हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपपत्र तयार केले होते.
या गुन्हयाची अंतिम सुनावणीवेळी 15 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. यात स्मिता मयेकर व अजय कदम यांनी दिलेली साक्ष ग्राहय धरुन जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोमीन यांनी रेणुका करकाळे हिला आजन्म कारावास, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून पुष्पराज शेटये यांनी काम पाहिले.