(मुंबई)
यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. या काळात सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस, तर एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार असल्याने गाड्यांची संख्या कमी असणार आहे. त्यातच नियमित गाड्यांची ४ आणि ५ सप्टेंबरची तिकीट रिग्रेट झाल्याने चाकरमान्यांची चिंता वाढली आहे.
मुंबईच्या लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के चाकरमानी आहेत. मुंबई आणि शहरातून गणेशोत्सवाकरिता सुमारे तीन ते साडेतीन लाख चाकरमानी कोकणात जातात. यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. त्याआधी दोन दिवस कोकणात पोहोचण्यासाठी चाकरमानी प्रयत्नशील असतात. कोकणात नियमितपणे जाणाऱ्या रेल्वे ४ आणि ५ सप्टेंबर रोजी रिग्रेट झाल्या आहेत. त्यामुळे आता रेल्वे गणेशोत्सवाकरिता स्पेशल ट्रेनची कधी घोषणा करते याची काळजी चाकरमान्यांना लागली आहे. गेल्यावर्षी मध्य रेल्वेने एकूण ३१५ गणेशोत्सव स्पेशल गाड्या चालविल्या होत्या. त्यातून सुमारे तीन लाख चाकरमानी कोकणात गेले होते.
गेल्यावर्षी गणेशोत्सवाकरिता एस.टी. महामंडळाच्या तीन हजार १०० जादा गाड्या बूक झाल्या होत्या. यंदा सुमारे साडेतीन हजार गाड्या चालविण्याचे एस.टी. महामंडळाचे नियोजन आहे. पावसाळी वेळापत्रकात २२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, २२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, बुधवार, शुक्रवारी तर २२२३० मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. याशिवाय ११०९९ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस शुक्रवार, रविवारी चालविण्यात येणार आहे.