( राजापूर )
🟧 राजापूर शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर सोमवारी चार मोकाट गुरांचा आकस्मिक मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने या गुरांची विल्हेवाट लावली आहे. मात्र या गुरांच्या आकस्मिक मृत्यु प्रकरणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी प्रश्न उपस्थित केला असून अन्न पदार्थातील विषबाधेमुळे या जनावरांचा मृत्यु झाला असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. या मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असताना नगर परिषदेने घाई गडबडीत या मृत जनावरांची विल्हेवाट लावल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे.
🟧 शहरातील राजीव गांधी क्रिडांगणावर सोमवारी चार मोकाट गुरे मृतावस्थेत आढळून आली आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाला माहिती मिळतात नगर परिषद प्रशासनाने ही मृत जनावरे ट्रक्टरमधून उचलून त्यांची विल्हेवाट लावली आहे.याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायलर झाले असून भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी या गुरांचा मृत्यु हा नैसर्गिक नसून राजीव गांधी क्रिडांगणावर दुषीत अन्न व अन्य प्लास्टीक वस्तु खाल्याने झाला असून नगर परिषद प्रशासन सत्य लपवत असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. नगर परिषदेच्या म्हणण्याप्रमाणे जर गुरे मोकाट असतील तरीही नगर परिषदेने एकाच वेळी मृत्यु पावलेल्या चारही मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता अत्यंत घाईने प्रशासनाने या गुरांची विल्हेवाट लावल्याने या गुरांचा मृत्यु हा संशयास्पद असल्याचा दावा गुरव यांनी केला आहे.
🟧 याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.