तालुक्यातील पिंपळी येथे एकाचवेळी पती-पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उशिरा उघडकीस आली. यापैकी पत्नीचा मृतदेह चिपळूण शहरानजीच्या खेर्डी येथील नदीपत्रात, तर पतीचा मृतदेह पिंपळी येथे त्याच्या घरी आढळून आला. कोणत्या कारणातून एकाच दिवशी अशी आत्महत्या झाली असावी याचे कारण पुढे आले नसून पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.
शरद पाटील (४२), स्वाती शरद पाटील (४०, दोघेही सध्या राहणार पिंपळी) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. शरद पाटील व स्वाती पाटील हे दोघे काही दिवसांपासून पिंपळी येथे भाड्याने रहात होते. शरद पाटील यांना कंबरेच्याखाली अपंगत्व आल्याने ते घरीच होते. तर स्वाती पाटील या घरकाम करीत असत. कोणत्यातरी अज्ञात कारणातून शरद पाटील यांनी घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली. तर पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पत्नी स्वाती चा मृतदेह खेर्डी येथील वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला.
या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना समजल्यानंतर ते त्वरित घटनास्थळी गेले होते. मात्र कोणत्या कारणातून या आत्महत्या झाली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.