जय जय रघुवीर समर्थ. जिला जगतज्योती म्हणतात किंवा जाणीव म्हणतात तिच्यामुळे प्राणी जगतात याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. पक्षी, श्वापद, किडा-मुंगी कोणतेही प्राणी जगामध्ये असले तरी त्याच्या अंगामध्ये निरंतर जाणीव असते. त्या जाणिवेमुळे ते आपले शरीर पळवतात त्यामुळे ते वाचतात. ते कुठेतरी लपतात आणि दडतात. हे जाणीवेमुळे होते. सगळ्या जगाला वाचवते त्यामुळे तिचे नाव जगतज्योती असे आहे. ती गेली तर प्राणी जिथल्या तिथे मरून जातील. मूळमायेतील जाणीवेचा विकार, त्याचा पुढे उदकाचे अनंत तुषार, रेणू निर्माण होतात त्याप्रमाणे विस्तार झाला. त्याप्रमाणेच देव-देवता, भूते आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरतात, त्यांना खोटे म्हणू नये.
अज्ञानी प्राणी भ्रमामुळे संकल्प करतो त्यामुळे त्याला बाधा होते. ज्ञात्याला संकल्पच नसतो त्यामुळे त्याला बाधा होत नाही, म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्यावर सर्व कर्मांचे खंडन होते, हे अनुभवाचे बोल आहेत त्याबाबत संदेह नाही. ज्ञान नसेल तर कर्माचा नाश होतो हे कधी घडत नाही, सद्गुरुविना ज्ञान जोडले जाणे हेही अघटीत आहे, म्हणून सद्गुरु करावा. शोधून सत्संग धरावा, तत्त्वविचाराचे अंतःकरणात मनन करावे. तत्त्वाने तत्व समजले की आपण स्वतःच तत्व होतो आणि अनन्यभावामुळे आपल्याला सार्थकता सहज येते.
विचार न करता जे केले ते सगळे वावगे, व्यर्थ गेले म्हणून विचारपूर्वक वागले पाहिजे. विचार करेल तो मनुष्य, विचार करणार नाही तो पशु. अशा प्रकारची वचने देवाने ठाई ठाई सांगितलेली आहेत. सिद्धांत वर्णन करण्यासाठी पूर्वपक्ष उडवायला लागेल, परंतु साधकांना निरुपणामध्ये साक्षात्कार होईल. तसा साक्षात्कार त्यांनी करून घ्यावा. श्रवण, मनन, निजध्यास आणि प्रचीती यामुळे विश्वास निर्माण झाल्यावर रोकडा साक्षात्कार होईल, वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत! असा निर्वाळा समर्थ देत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास नववा समाप्त.
दशक दहा समास दहा चलाचल निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म हे गगनासारखे पोकळ आहे. अंतराळ हे नेहमी उदंड उंच निर्गुण, निश्चल आहे. ज्याला परमात्मा म्हणतात त्याला अनेक नावे आहेंत, किती ते सांगता येत नाही. पण आदिअंती जसे आहे तसेच पसरलेले आहे. विस्तीर्ण पसरलेला पैस, भोवती दाटलेले आकाश भासच नाही म्हणून निराभास असे ते आहे. चारही बाजूंना, पाताळाच्या आतमध्ये, सगळीकडे, अंतराळामध्ये कल्पांत काळी, सर्वकाळी ते साठलेले आहे. असे एक अचंचल आणि अचंचल असले तरी चंचल भासते. त्याला त्रिविध प्रकारची नावेही खूप आहेत. ते दिसत नसताना नाव ठेवणे, न पाहतांना त्याची खूण सांगणे असे आहे मात्र जाणण्यासाठी नाव द्यावी लागतात. मूळमाया मूळप्रकृती मूळपुरुष असे त्याला म्हणतात. शिवशक्ती म्हणतात. नाना प्रकारची नावे आहेत. पण ज्याला नाव ठेवलेले आहे ते आधी ओळखावे, प्रचिती नसताना त्याची वल्गना करू नये. त्याचे रूप धरण्याची देखील सोय नाही नावावरूनच गोंधळू नये, प्रत्यय नसेल तर अनुमान करून गोंधळ वाढेल.
निश्चळ गगनामध्ये चंचल वारा भरारा वाजू लागला पण त्या गगनामध्ये आणि वाऱ्यामध्ये भेद आहे, त्याप्रमाणेच परब्रह्म निश्चल आणि माया चंचल आहे आणि तिचा भासतो तो भ्रम. त्या भ्रमाचाच संभ्रम करून दाखवतो. ज्याप्रमाणे आकाशामध्ये वारा वाहतो, त्याप्रमाणे निश्चळ ब्रह्मात इच्छा, चंचलता स्फूर्तिरूप आहे. अहंकारामुळे जाणीव झाली तिला मूळप्रकृती म्हटले. तिने ब्रह्मांडीची महाकारण असलेली माया रचलेली आहे. महामाया, मूळ प्रकृती, कारण हे अव्यक्त आहे. तिला सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणतात. विराट ते स्थूल असे पंचीकरण शास्त्रप्रमेय आहे. ईश्वर तनुचतुष्टय म्हणतात, त्यातील जाणीव ही मूळ माया आहे. असं गुढ ज्ञान समर्थ सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1