(रत्नागिरी)
ओबीसी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या शहरातील शांतिनगर-रसाळवाडी येथील अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह कुवारबाव येथील गणेशनगर- आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलावरील रुळांवर आढळला. ही घटना सोमवार, दि. १८ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रिया रावसाहेब रणदिवे (१८, रा. रसाळवाडी-शांतिनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ती घरातून मैत्रिणीचा ओबीसीचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी जाते, असे सांगून गेली होती. रात्री ८ वाजल्यानंतरही ती घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिच्या मित्र- मैत्रिणींकडे तसेच आजूबाजूला शोधाशोध केली; मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर रियाचे वडील रावसाहेब पोपट रणदिवे यांनी कुवारबाव पोलिस चौकीत खबर दिली.
रियाचे वडील व कुवारबाव पोलिस चौकीतील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड, तटकरी यांनी कुवारबाव परिसरात तरुणीचा शोध सुरु केला. शोध सुरु असताना रात्री ११ वा. च्या सुमारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळील ट्रॅकवर अत्यंत छिन्न विच्छिन्न अवस्थेत रियाचा मृतदेह आढळला. तत्काळ पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी रियाचे वडीलांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1