( राजापूर )
राजापूर तालुक्यातील डोंगर गावी शिमगोत्सवातील पालखी नेण्यावरून दोन गटात वाद झाला असून या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजापूर पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे 41 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
🟧 या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगर गावात शिमगोत्सवातील मानपानावरून गुरव विरूध्द शेलार अशा दोन गटात मागील काही वर्षांपासून वाद आहेत. शुक्रवारी शिमगोत्सवानिमित्त पालखी नेण्यासाठी दोन्ही गट ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र जमले असता पालखी नेण्यावरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आल्याची परस्पर विरोधी फिर्याद दोन्ही गटाकडून राजापूर पोलीस स्थानकात देण्यात आली आहे.
🟧 त्यानुसार राजापूर पोलिसांनी गुरव व शेलार अशा दोन्ही गटातील सुमारे 41 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी संशयितांवर भादंवि कलम 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करत आहेत.