(चिपळूण)
गावागावात शाळा होणे ही इच्छा मनात बाळगून पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांनी मार्गदर्शन केलेली, असुर्डे कासारवाडीतील ही खाजगी पसंत शाळा प्रगतीपथावर नेणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. चिपळूण तालुक्यातील असुर्डे कासारवाडीतील शिक्षणोत्तेजक मंडळाच्या खाजगी पसंत शाळेच्या सुवर्ण महोत्सवी उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, साहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, मांडकी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय कवितके, सरपंच पंकज साळवी, संस्थाध्यक्ष वसंत साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. निकम पुढे म्हणाले, एखादया शाळेने पन्नास वर्षांचा टप्पा पूर्ण करणे सोपे नाही. आजचे शाळेचे स्वरूप पाहिले की इथल्या शिक्षकांची शिक्षणाविषयीची रुची आणि तळमळ जाणवते. शाळेला भरभरून मदत करणारी लोकं इथं आहेत आणि अशा शाळा कमी आहेत असे निकम यांनी आवर्जून नमूद केले. शाळेने आगामी काळात काळाची पाऊले उचलून नर्सरी व सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची आवश्यकता आहे. या शाळेच्या भौतिक गरजांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ. निकम यांनी दिली.
सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात गोपूजन आणि ग्रंथदिंडीने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन, श्रीसरस्वती प्रतिमा व छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘करू स्वागत हे प्रेमभराने’ हे स्वागतगीत सादर केले. संतोष थेराडे म्हणाले, ‘पूर्वी दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके मिळत नव्हती. तिचतीच पुस्तके वापरावी लागायची. तसं शिक्षण घेऊन पिढी घडली. आज सर्वच विषयात आपण प्रगती केली. पण माणुसकी कमी झालेली जाणवते. याचं दु:ख आहे. पूर्वी माणुसकीचा आलेख उंचावलेला होता. माणुसकीचा आलेख पुन्हा उंचावायला हवा. शिक्षणातून हे साध्य व्हायला हवे आहे.’
वसंत साळवी यांनी सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गोविंदराव निकम यांनी शाळेच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी सांगितली. पन्नास वर्षांपूर्वी संस्थेला तातडीने भाग शाळा काढण्याचा पर्याय स्वीकारणे शक्य नव्हते. तशी काढली असती तर गावातअडचणीत असलेल्या कुटुंबातील सदस्याला शाळेत सामावून घेता आले नसते. त्याकाळात गावागावात वैचारिक सुबत्ता अधिक होती, त्यातून या शाळेचा जन्म झाल्याचे साळवी यांनी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका उल्का साळवी यांनी शाळेची प्रगती मांडली. शाळेतील मुले संगणक वापरतात, शाळा डिजिटल आहे असे त्या म्हणाल्या.
उद्घाटनानंतरच्या दोन दिवशीय सत्रात महाप्रसाद, महिला व बालविकास अधिकारी माधवी जाधव यांचे महिला कायदे विषयक मार्गदर्शन, हळदीकुंकू समारंभ, आजी-माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, रविवारी श्रीसत्यनारायण पूजा, माजी विद्यार्थी सन्मान सोहोळा, फनीगेम्स, लायन्स क्लब सावर्डे यांच्या सौजन्याने डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न झाले.
उद्घाटन कार्यक्रमात इंडियन आर्मीत निवड झालेला शाळेचा माजी विद्यार्थी शुभम चोगले व शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमन वसंत जाधव, माजी शिक्षिका अपर्णा भाताडे-घाणेकर यांचा आ. निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव साळवी व मुकुंद नरोटे यांनी केले. आभार सतिश पालकर यांनी मानले.