(पुणे)
किरकोळ वादातून थेट पेट्रोलपंप मालकाला मारहाण करण्याचा प्रकार पुणे महापालिकेजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर घडला आहे. दुचाकीत पेट्रोल भरायला झालेला उशीर झाल्याने कामगारासोबत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन माराहणीत झाले. यावेळी बांबूने पेट्रोल पंपाची तोडफोड करत मालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ४ तासात अटक केली. बाचाबाचीनंतर हे तिघे अर्ध्या तासांनी परत आले यावेळी त्यांनी सोबत बांबू आणले होते. यावेळी जुनी व त्याच्या सहकाऱ्यांनी बाबूंच्या सहाय्याने पेट्रोल पंपाची तोडफोड केली. त्यांच्या एक अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन अनिल शहा असे पेट्रोल पंप मालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी पुणे महापालिके जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर घडली.
पेट्रोल पंपाचे मालक सचिन अनिल शहा हे केबिन मध्ये बसले होते. सुरजितसिंग जुनी आणि त्याच्या साथीदारांनी सचिन शहा यांना बांबूने मारहाण केली. त्यात सचिन शहा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मनपा जवळील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची अफवा उडाल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. सुरजितसिंग युवराजसिंग जुनी (वय २४, जयसिंग जलसिंग जुनी (वय-१९, दोघेही रा. पाटील इस्टेट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ कचरू काळे (वय-२६) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तांत्रिक अहवाल आणि दुचाकीच्या नंबर वरून आरोपींचा शोध घेत चार तासाचा आत आरोपीना पोलिसांनी अटक केली.