(नवी दिल्ली)
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 56 रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी देखील राज्यसभेत जाण्याच्या शर्यतीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांतील उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत, ज्यामध्ये जेपी नड्डा आणि सोनिया गांधी यांचेही नाव आहे. राज्यसभेत पोहोचणाऱ्या नेत्यांची अशी आहे यादी.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले. सातव्या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या नसल्याने तो अर्ज छाननीतच बाद झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. ती संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी डॉ. अजित गोपछडे(भाजप) माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा ( शिवसेना-शिंदे) व प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी- अजित पवार) यांची निवड झाल्याचे घोषित करून, त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
गुजरात
गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत्या. या जागांवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गोविंद ढोलकिया, जशवंत सिंग परमार आणि मयंक नायक गुजरातमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभेत मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे गुजरातमधील भाजपचे केवळ चार नेते राज्यसभेत पोहोचले आहेत.
बिहार
बिहारमधील सर्व 6 उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेसाठी बिहारमधून भाजपचे २, आरजेडीचे २, जेडीयू १ आणि काँग्रेसचा १ उमेदवार रिंगणात होता, या सर्वांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. भीम सिंह आणि धरमशीला गुप्ता यांनी भाजपकडून तर संजय झा यांना जेडीयूकडून उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तेजस्वी यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे राजकीय सल्लागार संजय यादव, काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंह यांच्याशिवाय उमेदवारी दाखल केली होती. सर्व 6 उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
राजस्थान
राजस्थानमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये सर्वात मोठे नाव होते काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे. आता काँग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी यांच्यासह भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
मध्य प्रदेश
राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून आला आहे. भाजपने केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नरोलिया आणि बनशीलाल गुर्जर हे चार उमेदवार उभे केले होते. त्याचवेळी काँग्रेसने अशोक सिंह यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली होती. पाचपैकी एकाही उमेदवाराने नाव मागे घेतले नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.