(करबुडे/ दिलीप वासनिक)
दान पारमीता फाउंडेशनच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका सोयगाव येथील फर्दापूर मधील अजिंठा बुद्ध लेणी एकदिवसीय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा जवळील विद्यापीठ बुद्ध लेणी येथे दोन दिवसीय लेणी दर्शन व धम्म अभ्यास दौरा नियोजनपूर्वक अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य तसेच देशातील अनेक अभ्यासकांनी व मार्गदर्शकांनी उपस्थिती दर्शवून अजिंठा लेणी येथील भित्तीचित्र व शिल्प तसेच विद्यापीठ बुद्ध लेणी येथील शिल्पांची ऐतिहासिक माहिती अभ्यास दौऱ्यातून घेतली.
यावेळी दान पारमिता फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच लेणी अभ्यासक सुनिल खरे, संतोष अंभोरे व प्रविण जाधव यांनी उपस्थित अभ्यासकांना अजिंठा बुद्ध लेणीतील प्राचीन शिल्प साहित्य समजावून सांगत लेणी समुहाच्या प्राचीनत्वाला उजाळा देत मौलिक विचार मांडले. याप्रसंगी पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक डॉ संजय पाईकराव यांनी प्रमुख उपस्थिती राहून विद्यापीठ बुद्ध लेणीची अनमोल व कधी न ऐकलेली.सविस्तर माहिती दिली.
लेणी संवर्धक राहुल खरे यांनी अजिंठा लेणी क्रमांक १,२, १६, आणि १७ मधील बोधिसत्वाच्या जन्मावर जातक कथांच्या माध्यमातून आधारलेली भित्तीचित्रं उपस्थितांना समजावून सांगितली. अजिंठा लेणी येथे दगडात कोरलेल्या एकुण ३० लेणी समूह आहेत त्यापैकी लेणी क्रमांक ९, १०, १९, २६ व २९ हे चैत्यगृह असून अन्य सर्व विहार आहेत. अजिंठा बुद्ध लेणींचा उल्लेख भारतात आलेल्या चीनी यात्री यांच्या प्रवासात सुद्धा आढळून येतो. १८१९ मधे याठिकाणी वाघांची शिकार करण्यासाठी ब्रिटिश सैन्य अधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ आले असता त्यांना लेणी क्रमांक १० झाकलेल्या स्वरुपात आढळून आली. जेव्हा त्यांनी अधिक लक्ष दिले तेव्हा अजिंठा बुद्ध लेणी चा शोध लागला.
याठिकाणी वाघोरा नावाची नदी वाहते त्यामुळे सात ठिकाणी धबधबे तयार होतात ज्यांना सप्तकुंड धबधबा किंवा वाघोरा धबधबा म्हणतात. अजिंठा लेणी चे नाव अजिंठाच का पडले याविषयी अनेक मतं प्रचलित आहे त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध बौद्ध धर्म ग्रंथ महामयुरी मधे अजितांजय नावाच्या गावाचा उल्लेख आहे. या गावाचे नामकरण अजित बोधिसत्वाच्या नावावरून झाले असावे कारण अजित बोधिसत्वाचा उल्लेख अमिताभ सुत्रामधे आढळून येतो. नंतर अजितांजय नावाचा अपभ्रंश होऊन या गावचे नाव अजिंठा असे पडले. विद्यापीठ बुद्ध लेणी मध्ये महा अष्टभय शिल्प यावर विस्तृत माहिती लेणी अभ्यासक सुनील खरे व डॉ संजय पाईकराव यांनी दिली.
या अभ्यासकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देणारे अमोल बोर्डे, विकास रोडे ह्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी संतोष आंभोरे, प्रवीण जाधव, रुपाली गायकवाड, अर्चना वाघमारे, शांता मुलगे, अरविंद लोंढे, नेवेंद्र जांभूळकर वर्षा कदम, नेहा गांगुर्डे, दिलीप वासनिक, कविता शिंदे, वैशाली जीवने, प्रगती मेश्राम, युवराज वाघ, अलका गवई, साधना गांगुर्डे, राजू पगारे, बेवी शिंदे, जागृती तुपारे, संपूर्ण महाराष्ट्रातील 60 ते 70 लेणी व लिपि अभ्यासक उपस्थित होते.