(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील प्रचंड धुळीसह खड्डय़ांनी रत्नागिरीकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. रत्नागिरीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेबंबाळ झाल्याने खड्डय़ांतून जाण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय उरलेला नाही. या रस्त्यांवर लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यांचे चौपदरीकरण करून ते प्रवास सुखकर, खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सरकारने सोडला खरा; पण हा विकासाचा घाटच नागरिकांची वाट बिकट करू लागला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाची घाई सुरू आहे. ठेकेदार कंपनीकडून रस्ता सुरक्षेचे नियम व अटीं धाब्यावर बसवून ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. या ठेकेदाराने रेल्वे स्थानकापासून अचानक रस्ता उखडण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातखंब्याच्या दिशेने केवळ रस्ता उखडून ठेवण्याचा अनोखा कार्यक्रम हाती घेतला. या उखडलेल्या मातीच्या रस्त्यावर रोलर फिरविण्याचा दिखावपणा करून सध्या रस्त्यावर लहान-मोठें काही ठिकाणी पाच सहा इंचाचे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरून वाहनचालकांना तारेवरची कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हे काम रवी इफ्रा लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मिऱ्या ते साखरपा हा अंदाजे ५५ किमीचा मार्ग आहे. या रस्त्यावर काँक्रीटीकरणाची पक्की मार्गिका केवळ मोजक्याच ठिकाणी करण्यात आली असून तेही फक्त काही मीटरपर्यंत काम केले आहे. यातून काम सुरू असल्याचा दिखावपणा केला जातोय का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. यामध्ये मिऱ्यापासून शंभर मीटर, रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून शंभर मीटर आणि दाभोळे मेढे दरम्यान पाचशे मीटर अशा या भागात पक्की मार्गिका तयार करून त्यावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उर्वरित भागात काम सुरू असल्याने वाहनचालकांना होणारा नाहक ‘त्रास कमी होता होईना अन् महामार्ग पूर्णत्वास जाईना’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. मात्र जनतेचे सेवक म्हणवून घेणारे एकही पुढारी यावर कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाही. त्यामुळे जनतेमधून आता लोकप्रतिनिधींसह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.
“खड्डेबंबाळ” रस्त्यांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
सर्व्हिस रोड उखडून त्यावर केवळ रोलर फिरवून वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. ज्या भागात सर्व्हिस रोडची खोदाई केली त्या भागाचे तुकड्यात काँक्रीटीकरण करून मार्गिका तयार करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता नियोजन शून्य कारभार सुरू असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. खड्डय़ांमधून वाहन न्यावे लागत असल्याने बसणार्या दणक्यांनी मणक्यांच्या दुखापतीसह कंबरेच्या वरील माकड हाडाजवळील गादी सरकणे, कंबर वा मान लचकणे आदी प्रकारची दुखणी वाढीस लागली आहेत. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासह युवावर्गालाही होत आहे.
धुळीमुळे धुक्यातून काढावा लागतोय मार्ग
रस्त्यांवरील उसळत असलेल्या धुरळ्यामुळे रत्नागिरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीचा फटका सर्वाधिक महामार्गालगत असणाऱ्या घरांसह रोडवरील वाहनधारक, वैद्यकीय रुग्णालये, हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, दुकानदार आणि रहिवाशांना बसत आहे. या मार्गावरील खड्ड्यांतील धुळीमुळे धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे आरोग्य धोक्यात घालणे, असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
चौपदरीकरणाच्या कामांमुळे रुंद झालेले रस्ते, त्यांवर पडलेले कमी-अधिक उंचीचे खड्डे, आणि वाहतूक कोंडी अशा विविध कारणांमुळे रत्नागिरीतील रस्त्यावरून वाहने चालवताना चालकांची दमछाक होतेय. सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे म्हणता येणार नाही. मात्र सर्वच ठिकाणी सर्व्हिस रोड उकरून ठेवण्याचे कारण काय? यातून महामार्गाच्या कामांवर अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, त्यामुळे रामभरोसे कारभार सुरू आहे.
-दिपक कांबळे साखरपा