माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे काही काँग्रेस नेते येत्या काळत भाजप पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अशोक चव्हाण यांच्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा आणि खासदार नकुलनाथ यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कमलनाथ कधीही भाष्य करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेस लिहिलेला X काढून टाकल्याने कमलनाथ आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये सामील होण्याच्या अटकळांना आणखी बळ मिळाले आहे. याच्या काही वेळापूर्वीच कमलनाथ यांनी अचानक आपला छिंदवाडा दौरा रद्द करून आपल्या मुलासह दिल्लीला रवाना झाले होते.
दिल्लीत भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू असताना कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे होणारी परिषद आणि 18 फेब्रुवारी रोजी तामिया येथे होणारी सभा रद्द केली. कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्यानं वृत्त आहे की, खासदार नकुल नाथ यांच्यासह कमलनाथ यांच्या जवळचे 10 आमदार आणि अनेक समर्थक भाजपात प्रवेश करू शकतात. कमलनाथ यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे 10 आमदारही भाजपात जाणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. यासोबतच अनेक माजी मंत्री, आमदार आणि कमलनाथ समर्थक काँग्रेस कार्यकर्ते भाजपाचं सदस्यत्व घेऊ शकतात.
गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशच्या राजकारणात ज्याप्रकारे जल्लोष सुरू आहे, त्यामुळे कमलनाथ आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी शुक्रवारी कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. कमलनाथ आणि नकुलनाथ यांना भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
कमलनाथ हे काँग्रेसचे पाच दशकांपासूनचे जुने नेते आहेत. अनेक प्रमुख नेते काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत, परंतु कमलनाथ हे अशा काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत जे नेहमीच गांधी घराण्यातील सर्वात निष्ठावान नेत्यांमध्ये होते. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेससाठी लाेकसभा निवडणुकीपूर्वी माेठा धक्का असेल.