(संगमेश्वर/ प्रतिनिधी )
शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचा निरोप घेतांना नकळत आपले मन दाटून येते.बोलायचे खूप कांही आहे, पण शब्द सुचत नाहीत. एक तर या शाळेचा शेवटचा दिवस,तर दुसऱ्या बाजूला मन म्हणते यानंतर पुढील शिक्षणाची खरी लढाई सुरू होणार आहे, जगाच्या स्पर्धेमध्ये उडी मारावी लागणार असल्याने मनामध्ये घालमेल चालली आहे. असे विचार मनात येत असतानांच माझ्या शालेय जीवनात शाळेने ,शिक्षकांनी विद्यार्थी मित्र मैत्रीणींनीकडून मला खूप चांगले अनुभव मिळाले.त्यामुळेच येथून निरोप घेतांना भावना खूप दाटून येत आहेत, अशाप्रकारची भावनिक मनोगते इयत्ता दहावी – बारावीच्या विद्यार्थांनी निरोप समारंभा प्रसंगी व्यक्त केली.
आ.बा.सावंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नायशी तालुका चिपळूण येथे दहावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्था, शिक्षक,व विद्यार्थी यांच्याकडून आयोजन करण्यात आला होता.त्याप्रसंगी शाळेस भेट म्हणून सभागृहाचे विद्युत फिटिंग,व प़ंखे यांच्या खर्चाची रक्कम धनादेश विद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक आनंदा घाटगे यांना नुकताच विश्व समता कलामंच लोवले या संस्थेकडून राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक ” पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्था शाळा व विद्यार्थ्यांच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना यश प्राप्तीसाठी गुणात्मकता, संस्कार, बौद्धिक ज्ञानाला महत्त्व देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने अविरत सातत्य ठेवून करियर संपन्न बना व आपल्या आई-वडिलांचे तसेच शिक्षक विद्यालयाचे नाव रोशन करा अशाप्रकारे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष सुमित चव्हाण यांनी केले. यावेळी संस्थेचे माजी सेक्रेटरी व कळंबुशी गावचे माजी सरपंच विलासराव चव्हाण, मुख्याध्यापक घाटगे, माजी विद्यार्थी श्रीकृष्ण खातू आदी मंडळींनी आप आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुमित चव्हाण, उपाध्यक्ष सुरेश आग्रे, खजिनदार रुपेश गोसावी, माजी अध्यक्ष श्रीधर घाग, सदस्य किशोर कदम, दत्ताराम झगडे, शिक्षक राजेश माळी, शेजाळ, नवले , गवळी, सचिन कोळतस्कर , दिनेश झगड़े आदी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश उत्तरे यांनी केले