(गुहागर)
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी नीलेश राणे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नीलेश राणे यांनी बाळासाहेबांच्या शब्दासाठी नारायण राणेंनी घर विकल्याची एक आठवण सांगत बाळासाहेबांवरील राणेंचं प्रेम किती होतं हे सांगतिलं. तसेच बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी दादा (नारायण राणे) कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते जेवलेसुद्धा नाहीत अशीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची आठवण सांगितली. “नारायण राणे यांचं बाळासाहेबांवर अफाट प्रेम. बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला. हे समजणारे आमचे नारायण राणे. अरे तू (भास्कर जाधव) काय ओळखतो नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील प्रेम. ज्यादिवशी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा आम्ही लंडनला होतो. आमचे वडील जेवले सुद्धा नाहीत. आमचं आख्खं घर रडलं. तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतो”, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
माजी खासदार नीलेश राणे पुढे म्हणाले की, आज सभा घेण्याची काही गरज नव्हती. परंतु उद्धव ठाकरे कोकणमध्ये आले होते. कणकवलीमध्ये त्यांची सभा पार पडली. त्या सभेत भास्कर जाधव नावाच्या लांडोराने आमचे नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्याची आता काही खैर नाही. आज सभेसाठी येण्याआधी जे घडलं ते आवडलं आपल्याला. गुहागर येथील सभेसाठी भाजप नेते निलेश राणे जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पण हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे उद्धव ठाकरे आले होते. तेव्हा भास्कर जाधव हा नको नको ते बोलला. आम्हाला काहीही बोला, पण नारायण राणेंवर बोलेलं हे आम्हाला आवडत नाही. तिकडे नाशिकमध्येही नारायण राणेंवर टीका. शिवाजी पार्कमध्ये तेच. परवा कणकवलीला आला तेथेही टीका केली.
गुहागर मतदार संघात यापूर्वी अनेक आमदारांनी चांगले काम केले. परंतु भास्कर जाधवांनी ते नाव कमी केलं. काम जर चांगली केले असते तर आजची दगडं पडले नसते. भास्कर जाधव तू आमच्या शेपटीवर पाय ठेवलास. तुला सोडणार नाही. अनेक दिवसांपासून तुला ऐकतो. या भिकारचोटाला कुणी मातोश्रीमध्ये घेतला नसता. साला बिस्कीट चोर. कुणाला हुशारी शिकवतो. आम्ही ठाकरेंना नाही घाबलो, पवारांनाही नाही घाबरलो, आम्ही मुंबईत राहतो. भाईगिरीचं सर्टीफिकेट मुंबईतून मिळतं. तू काय सांगतो आम्हाला. पोपटी रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. पोलिसांच्या, महिलांच्या गराडाच्या मागे लपला. दगडं मारली त्याच्या बदल्यात काय पाठवतो त्याचा विचारही करणार नाही, असाही इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे म्हणाले की, जाहीर सभेत सांगतो की, मला बाळासाहेबांनी बोलावलं आणि विचारलं की, नाराण राणेंना मी काय दिलं नाही. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधीच आले नव्हते की तुला (भास्कर जाधव) जवळ बोलावतील. नारायण राणेंनी जेवढं बाळासाहेंबावर प्रेम केलं ना त्याच्या 25 टक्केही प्रेम जाधव यांनी केलं नसेल. याचवेळी नीलेश यांनी बाळासाहेब आणि नारायण राणेंची एक आठवण सांगितली.
त्यावेळी बाळासाहेंब म्हणाले नारायण हे काँग्रेसचं सरकार आपल्याला पाडायचं. हे सरकार पाडलं गेलं पाहिजे. त्यावेळी नारायण राणेंनी बाळासाहेबांना शब्द दिला की, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा नारायण राणे यांच्याकडे पैसा नव्हता. फक्त कार्यकर्त्यांची फौज होती. विरोधी पक्षनेते असताना नारायण राणेंनी स्वतःचं घर गहाण ठेवलं. हे करु शकते का भास्कर जाधव. माझ्या आईने विचारलं की, आपण राहायचं कुठे? तर नारायण राणे म्हणाले मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे. योगायोगाने ते सरकार टिकलं नाही. पण नारायण राणे गेले नाहीत बाळासाहेबांकडे मदत मागायला, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.