(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पूर्वीपेक्षा माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गावांची संख्या अनेक पटीने वाढली आहे . माघी गणेशोत्सव निमित्त गावातील मंडळे क्रीडा स्पर्धा, रक्तदान, आरोग्य तपासणी यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. उत्सवाचे हे बदलते स्वरूप नक्कीच अभिनंदनीय म्हटले पाहिजे. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजीकच्या धामणी येथे असलेल्या संगम गणेश मंदिराच्या पालखी प्रदक्षिणेवर यावर्षी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शेकडो भक्तगणांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
धामणी येथील संगम गणेश मंदिरात हेलिकॉप्टर मधून झालेली पुष्पवृष्टी ही आकाशातून नव्हे , तर मंदिराच्या वरील बाजूस विवेक वसंत पाध्ये यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या हेलिकॉप्टरच्या प्रतिकृती मधून पालखी प्रदक्षिणेवर ही पुष्पवृष्टी करण्यात आली. धामणी गावात अशा प्रकारचा सोहळा प्रथमच संपन्न झाल्याने परिसरातील असंख्य भक्तगणांनी धामणी येथे गर्दी केली होती.
विवेक वसंत पाध्ये यांचे संगमेश्वर येथे गादी तयार करण्याचे दुकान आहे. त्यांच्या डोक्यात नेहमीच विविध संकल्पना येत असतात. यापूर्वी त्यांनी गोळवली येथील चैतन्य पाध्ये हा नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर त्याच्या अनुभव कथन कार्यक्रमादरम्यान भव्य आणि सुंदर असे फिरते भव्य कमळ पुष्प तयार केले होते. त्यावेळी देखील विवेक पाध्ये यांच्या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले होते. धामणी येथे माघी गणेशोत्सव गेले अनेक वर्ष उत्साहात साजरा केला जातोय.
यावर्षीच्या माघी गणेशोत्सवात काहीतरी वेगळे करूया असे विवेक वसंत पाध्ये यांच्या मनात आले. उत्सवाआधी एक महिना विवेक आपल्या संकल्पनेवर काम करू लागला. गणेश जयंतीच्या दिवशी सायंकाळ नंतर ज्यावेळी पालखी प्रदक्षिणा घातली जाते त्यावेळी हेलिकॉप्टर मधून या पालखीवर पुष्पवृष्टी करण्याची तयारी विवेक याने सुरू केली. यासाठी लागणारा सर्व खर्च विवेक याने स्वतःच केला. हेलिकॉप्टरची लांबरुंद अशी एक प्रतिकृती तयार करून त्याला मोटर बसवत एका बाजूला उभ्या असलेल्या माणसाकडे त्याचा कंट्रोल ठेवून पालखी मंदिरासमोर आल्यानंतर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करताना उपस्थित भक्तगणांनी टाळ्यांच्या गजरात विवेक याच्या संकल्पनेला दाद दिली. काही भक्तगणांना तर विवेकच्या या संकल्पनेने अश्रू अनावर झाले. जवळपास तीन किलो फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव पालखीवर करण्यात आला. पाच मिनिटांपेक्षा अधिक काळ पुष्पवृष्टीचा हा नयनरम्य सोहळा सुरू होता.
विवेक पाध्ये याने केवळ हेलिकॉप्टर मधून पुष्पृष्टीच केली असे नव्हे, तर मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी मंदिराच्या प्रतिकृतीचे हुबेहूब मखर देखील तयार केले होते. संगम गणेश मंदिरात, मूळ मंदिराचीच हुबेहूब प्रतिकृती पाहून भक्तगणांनी विवेकच्या संकल्पनेचे आणि कलेचे तोंड भरून कौतुक केले. या सर्व प्रतिकृती तयार करण्यासाठी विवेक पाध्ये याला दहा हजार पेक्षा अधिक खर्च आला. संगम गणेश मंदिराची सेवा म्हणून हा खर्च त्याने स्वतःच केला. विवेक पाध्ये याच्या डोक्यामध्ये अशाच वेगवेगळ्या संकल्पना येत असतात. यावर्षी माघी गणेशोत्सवातील पालखी प्रदक्षिणेवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्याच्या विवेकच्या संकल्पनेचे आमदार शेखर निकम यांनी कौतुक केले. विवेक याचा मंदिरातच त्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला . याबरोबरच देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विवेकचा सन्मान करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.