जय रघुवीर समर्थ. जीवपणामुळे अहंकारामुळे जन्म सहन करावा लागतो जर विवेक असेल प्राण्यांना जन्म घ्यावा लागत नाही. जन्ममृत्यूपासून सुटला म्हणजे मोक्ष झाला. तत्व शोधतां शोधता तत्वच झाला. ती वस्तू म्हणजे मी हे महावाक्याचे लक्षण आहे ते साधू लोक आपल्या मुखाने निरूपण करतात. ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मोक्ष झाला. आत्म्याला काही बंधन आहे असे म्हणूच नका. आता शंका दूर झाली, संदेहवृत्ती मावळली.
संतांच्या सहवासामुळे ताबडतोब मोक्षाची पदवी प्राप्त झाली. स्वप्नामध्ये जो बांधला गेला होता तो जागृतीने मोकळा केला. ज्ञानाच्या विवेकामुळे मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्ती झाली. अज्ञान रात्रीच्या शेवटी संकल्प दुःखे नाहीशी झाली त्यामुळे तत्काळ मोक्षाची प्राप्ती झाली. स्वप्नाचे बंधन तोडण्यासाठी जागृती शिवाय अन्य काही साधन लागत नाही. त्याप्रमाणे संकल्पाने बांधलेल्या जीवाला सोडविण्यासाठी विवेक हाच उपाय होय. विचारपूर्वक पाहिले तर आपण स्वतःच आत्मा आहोत. आत्म्याच्या ठायी बंधन-मुक्ती दोन्ही नाही. जन्म-मृत्यू हे आत्म्याला नसते. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे मोक्षलक्षण नाम समास सप्तम समाप्त.
दशक आठ समास आठ आत्मदर्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आपण स्वतःच परमात्मा आहोत, असं निरूपण आपण मागे केलं. त्या परम्यात्म्याचे लक्षण सांगतो. जन्म नाही, मृत्यू नाही, येणार नाही, जाणार नाही, बंधन नाही, मोक्ष नाही, दोन्ही नाही. परमात्म्याला परमात्मा निर्गुण, निराकार. परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर, परमात्मा सर्वांपेक्षा व्यापक, परमात्मा अनेकामध्ये एक. परमात्म्याच्या विवेक अतर्क्य आहे. अशी परमात्म्याची स्थिती आहे असं वेद आणि श्रुती सांगतात. परमात्मा भक्तीने मिळतो याबाबत कोणताही संशय नाही. त्या भक्तीचे लक्षण नवविधा प्रकारे केले जाते. त्या नवविधा भक्तीच्या भजनामुळे अनेक भक्त पावन झालेले आहेत. या नवविधांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिवेदन. त्याचा स्वतःच्या अनुभवाने विचार करावा. आपल्या अनुभवाने आपणासमोर समर्पण करावे आणि जाणून घ्यावे.
महत्पूजेच्या अंती देवाला मस्तक वाहिले जाते त्याप्रमाणे आत्मनिवेदनाची निकट भक्ती आहे. स्वतःला समर्पण करतात असे भक्त थोडे असतात. त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. आपल्या स्वतःचे समर्पण कसे करावे कुठे जाऊन पडावे किंवा मस्तक देवापुढे तोडावे? असा प्रश्न श्रोत्याने विचारला. असे ऐकून बोलणं वक्ता म्हणतो, श्रोत्यांनी सावधान होऊन एकाग्रतेने ऐका. आत्मनिवेदनाचे लक्षण म्हणजे आधी मी कोण हे पहावे. मग निर्गुण परमात्मा ओळखावा.
देव आणि भक्ताचा शोध घेतला असता आत्मनिवेदन होते, देव हा पुरातन आहे असं भक्त पाहतो. देव ओळखू येताच तद्रूपता येते. देव आणि भक्त हे विभक्त मुळीच नाहीत. विभक्त नाहीत म्हणून भक्त आहेत. बंधन नाही म्हणून मुक्त आहेत. हे शास्त्राच्या आधाराने बोलतो त्यामुळे अयोग्य नाही, योग्य आहे. देव आणि भक्ताचे मूळ पाहिले असता भेद हा नाहीसा होतो आणि परमात्मा दृश्यावेगळा होतो. तो मिळाल्यावर दुसरेपण राहत नाही. देव-भक्त हा अडसर निघून जातो. आत्मनिवेदन केल्यानंतर जी अभेद भक्ती घडते तिलाच सायुज्यमुक्ती असं म्हणतात. जो संतांना शरण गेला, अद्वैतनुरुपणामुळे ज्याला बोध झाला, मग त्याला वेगळा केला तरी तो वेगळा होणार नाही. अशा तऱ्हेने मुक्ती त्याला मिळेल, असं समर्थ सांगतात. पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127