(लांजा)
वाटूळ ते दाभोळे रस्त्याने चालत जाताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. हे मंगळसूत्र १२ ग्रॅमचे असून, त्याची किंमत ५० हजार इतकी आहे. हा प्रकार भांबेड (ता. लांजा) येथे शनिवारी सायंकाळी घडला. हे चोरटे दुचाकीवरून भांबेडच्या दिशेने पळून गेले.
याबाबत भांबेड-वलणवाडी येथील नम्रता चंद्रकांत कोकाटे (५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्या शनिवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मुलीच्या सासूकडे वाटूळ ते दाभोळ रस्त्याने चालत जात होत्या. या मार्गावरील भांबेड येथे एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या व रस्त्याच्याकडे तंबाखू मळत बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र नकळत चोरले, या चोरट्यांनी महिलेला ‘ओरडू नकोस’ असे ओरडून हातातील पर्स जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही पर्स त्यांच्या हाताला लागली नाही. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे हे करीत आहेत.