(चिपळूण)
तालुक्यातील डेरवण येथील राजेवाडी धरणाला लागलेल्या गळतीमुळे सुरक्षिततेसाठी चार वर्षांपूर्वी पाणी सोडून धरण रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरातील दहा ते बारा गावांना चार वर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र, चार वर्षांनंतर या धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. दुरुस्तीच्या १५ कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या दुरुस्तीमुळे डेरवण, सावर्डेसह परिसरातील पाणीप्रश्न सुटणार आहे.
डेरवण पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे, शेती उत्पादनाला वाव मिळावा. या हेतूने डेरवण वालावलकर ट्रस्टचे काका महाराज यांच्या परिश्रमाने सन १९९५-९६मध्ये राजेवाडी धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर सन २००० मध्ये सुमारे १० कोटी रुपये खर्चुन धरणाचे काम पूर्णत्वास गेले; मात्र चार वर्षांपूर्वी धरणाच्या मुख्य विमोचकामधून अचानक गळती सुरू झाल्याने येथील जलसंधारण विभागाने धरण रिकामे केले; मात्र दुरुस्ती न झाल्याने धरणात खडखडाट होता. गेल्या चार वर्षांपासून कापशीनदी पात्र पाण्याविना कोरडे पडलेले आहे.
परिणामी परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. येथील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धरण दुरुस्ती चार वर्षे जैसे थे अवस्थेत राहिली. परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेत आमदार शेखर निकम यांनी धरण दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर फाईल पुढे पुढे सरकली आणि दोनवेळा अंदाजपत्रके तयार करण्यात आली. अखेर शुक्रवारी या धरण दुरुस्तीसाठी १५ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. धरण दुरुस्तीसाठी निधी मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड, उपअभियंता सागर भराडे यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने या भागातील पाणीटंचाईचे सावट दूर होण्यास मदत होणार आहे.