(मुंबई)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पैशाच्या वादातून व रागातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि आरोपीने स्वतःला पण डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती समोर येत आहे. दहिसर येथे ही घटना घडली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर तातडीने त्यांना दहिसरमधील ‘करुणा’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. परंतु छातीत गोळी लागल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. ते उपचारांना प्रतिसादही देत नव्हते. काही मिनिटांत त्यांच्यावर गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली होती. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
अभिषेक यांना 5 गोळ्या झाडल्या गेल्याची माहिती आहे. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. अभिषेक यांच्या छातीवर पहिली गोळी लागली. पहिली गोळी लागल्यानंतर ते खाली वाकल्यामुळे दुसरी गोळी त्यांच्या खांद्याला लागली. दोन गोळ्यानंतर ते खाली पडत असतानाच तिसरी आणि चौथी गोळी त्यांच्या पाठीला लागली. फेसबुक लाईव्हच्या चौथ्या मिनिटाला हा गोळीबार झाला, परंतु गोळीबारानंतर पुढील ४५ मिनिटे हे फेसबुक लाईव्ह सुरूच होतं. ४९ व्या मिनिटाला अखेर हे फेसबुक लाईव्ह बंद करण्यात आले.
अभिषेक हे मुंबईतल्या दहीसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक आहेत. तसंच ते मुंबै बँकेचे संचालकदेखील आहेत. घोसाळकर पितापुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत. खासगी वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जातंय. अभिषेक यांना बोरीवलीच्या करूणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मॉरिस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणून घेत होता. मॉरिस हा बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला तुरुंगात जायला लागलं, असा त्याचा संशय होता. तेव्हापासून अभिषेक यांच्याबद्दल त्याच्या मनात राग होता. तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर मॉरिसने अभिषेक यांचा काटा काढण्याचं ठरवलं.
एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.