(रत्नागिरी)
आंबा बागेतील एका झाडावर चढून फांदीला ओढणी बांधून गळफास लावून नेपाळी तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार जुवे (ता. रत्नागिरी) येथे घडला. सुमन लालवीर बिका (२४, रा. जुवे, रत्नागिरी, मूळ रा. भोराई, भैसापला, नेपाळ) असे तिचे नाव आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.
सुमन बिका ही जुवे मळी येथील आंबा बागेत कामाला होती. बागेतच ती राहत होती. ती रविवारी सायंकाळी ७:२० वाजण्याच्या दरम्यान बागेतील एका आंब्याच्या झाडावर चढली. त्यानंतर फांदीला ओढणी बांधून गळफास लावून झाडावरून उडी मारली. ती लटकलेल्या स्थितीतच आजूबाजूच्या कामगारांनी पाहिल्यानंतर याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने कोयत्याने ओढणी कापून तिला खाली उतरविण्यात आले आणि एका खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात सोमवारी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे