(संगमेश्वर)
कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे प्रसिद्ध कवी जयराम विठ्ठल पवार यांनी ‘कवी आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत भेट दिली.
प्रशालेतील मराठी भाषा विभागांतर्गत कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात कवी ज.वि.पवार यांनी मार्गदर्शन लाभले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, कविता समाजातील अनिष्ट रूढी – परंपरावर आघात करतात.जे ५० ओळीत मांडता येत नाही ते कवी ४ ओळीत मांडतो.इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात असलेल्या त्यांच्या कवितेच्या समावेशाबद्दल ते म्हणाले की ही कविता पाठ्यपुस्तक मंडळाचे तत्कालीन सदस्य भालचंद्र फडके यांनी घेतली. ही कविता गेली ४० वर्षे अभ्यासक्रमात असून तो एक जागतिक विक्रम आहे.
ही कविता त्यांना कशी सुचली असे विचारले असता ते म्हणाले की, १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला होता,या विषयावरचं ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ ही कविता लिहिली.कविता लिहिणे ही सहजसोपी गोष्ट नसून त्यासाठी कवीला वेदना व्हावी लागते.आईला बाळाला जन्म देताना जश्या सहन कराव्या लागतात तश्या वेदना कवीला होत असतात.तेच कविता लिहितील ज्यांची हृदये वेदना गातील.कवी जीवनाला एक वेगळा संदर्भ देत असतात. कवी हा आपल्या कवितेमधून विचार पेरीत असतो त्यामुळे कवी हा एक विचारवंत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निलेश कुंभार यांनी सांगितले की, आपण अभ्यासत असलेला धडा ज्यांनी लिहिला आहे त्यांची प्रत्यक्ष भेट झाली तर त्या धड्यामागील प्रेरणा व उद्देश प्रभावीपणे लक्षात येऊ शकतो यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास डिक, मुख्याध्यापक शेषेरावअवघडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत किंजळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद कडवईकर, प्रदिप कानाल यांनी मेहनत घेतली.