(रत्नागिरी)
भारताचे प्रथम राष्ट्रीय विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के जी एन सरस्वती फाऊंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात प्रारंभ झाला. मूळचे देवरुखचे असलेल्या कै. सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत २०१३ सालापासून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.
चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न आंबूलकर व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी बुद्धिबळाच्या पटावर प्रतिकात्मक चाली करून स्पर्धेचा शुभारंभ केला.
भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहा वर्षे खुल्या बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या जात आहेत. या खेळाला ग्लॅमर मिळवून दिले पाहिजे. रत्नागिरीतही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित कराव्यात. रत्नागिरीतून बुद्धिबळाचे राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, ही सप्रे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी केले.
केजीएन सरस्वती फाऊंडेशन व चेसमेनतर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सौ. ऋचा जोशी, सीए उमेश लोवलेकर व्यासपीठावर प्रमुख होते.
स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून एकूण १०८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. यापैकी ४० हून अधिक खेळाडू अंतरराष्ट्रीय फीडे गुणांकन प्राप्त खेळाडू असून आयोजकांकडून एकूण एक लाखांची बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत. सात, नऊ, अकरा, तेरा, पंधरा वर्षाखालील गटासोबतच सर्वोत्कृष्ठ वरीष्ठ व दिव्यांग खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले काम पाहत आहेत. के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांसोबत चेसमनच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी मेहनत घेतली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी सायंकाळी करण्यात येणार आहे.