संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड सारख्या दुर्गम गावामध्ये जन्मलेल्या एका छोट्या चित्रकाराने उंच भरारी घेतली आहे. द बॉम्बे आर्ट सोसायटीने देश पातळीवर भरवलेल्या 130 व्या वार्षिक कला उत्सवात अश्विन खापरेच्या निसर्ग चित्राला परीक्षक पारितोषिक प्राप्त झाले. या कार्यक्रमात त्याच्या चित्राचे कौतुक करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते अश्विन खापरे याला गौरवण्यात आले.
अश्विन याला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड आहे. त्याने काढलेली अनेक हुबेहूब चित्रं लक्ष्यवेधी आहेत. तो संगमेश्वर येथील पैसाफंड कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सध्या तो जे.जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये उच्च शिक्षण घेत असून जलरंग हे त्याचे आवडते माध्यम आहे. त्याने काढलेल कॅडबरीचं चित्र तर अक्षरशः हुबेहूब कॅडबरीच वाटत आहे. अशी अनेक चित्र त्याने काढली आहेत. त्याची आकर्षक चित्र संगमेश्वर पैसाफंडच्या आर्ट गॅलरीत लावण्यात आली आहेत. अश्विनची तल्लक बुद्धी आणि कल्पना शक्तीच्या आधारे काढलेली चित्र अनेकांची मने वेधून घेतात.
द बॉम्बे आर्ट सारख्या नावाजलेल्या सोसायटीमध्ये देशभरातून अनेक चित्रकार येथे येत असतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेत अश्विनच्या चित्राला आज देश पातळीवर चमकण्याची संधी मिळाली. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.