(गुहागर)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ नेहमी नवनवीन उपक्रम राबविण्यात/ठराव करण्यात नेहमी अग्रेसर असते. असाच एक ठराव गुरूवार दि. २५.१.२०२४ रोजी उमराठ येथील नवलाई देवीची सहाण येथे झालेल्या ग्रामसभेत सर्वांनुमते एकमताने करण्यात आला. “प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्टील बाटली नेहमी वापरणे” असा हा ठराव आहे,
सदर ग्रामसभेत सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आपल्याकडून वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशवीचे व प्लास्टिक बाटल्यांचे दुष्परिणाम समजावून सांगताना सांगितले की, प्लास्टिक हे पिशवी किंवा बाटली अशा कोणत्याही स्वरूपात असो त्याचे विघटन लवकर होत नाही, त्यातील क्षार वस्तूंत किंवा पाण्यात मिसळत असतात. ते इतरत्र टाकल्यास अस्वच्छता तर होतेच परंतु प्रदुषण सुद्धा होते तसेच प्लास्टिक बाटलीतील अनेक दिवसांचे पाणी प्यायल्याने कर्करोग व इतर रोगांना आमंत्रण दिल्या सारखे होते. त्यामुळे सदरचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार मार्केटमधून किराणामाल, भाजीपाला आणताना कापडी पिशवीचाच वापर करण्याचे व मांस, मच्छी आणताना स्टील डब्याचा पुर्वी प्रमाणे वापर करण्याचे ठरविण्यात आले.
सुरूवातीला ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ यांनी कार्यसूची (अजेंडा) प्रमाणे विषय मांडले. सदर विषयांवर ग्रामसभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली आणि विकास कामांबाबत योग्य ते निर्णय घेण्यात आले. सदर ग्रामसभेत शैक्षणिक बालसभा सुद्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद उमराठ शाळा नं.१ आणि जिल्हा परिषद उमराठ शाळा नं.३ या शाळेतील सुमारे ४५ विद्यार्थी आणि दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रमे अनिल अवेरे व शैलेश सैतवडेकर उपस्थितीत होते.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापकांनी तसेच विद्यार्थ्यांनी शाळेतील भौतिक गरजा, अडी-अडचणी ग्रामसभेत मांडल्या. त्यांवर चर्चा झाली. निधी उपलब्धतेनुसार आवश्यक ती कामे प्राधान्याने करण्याचा प्रयत्न करता येतील असे आश्वासन सरपंच जनार्दन आंबेकर आणि ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ यांनी दिले. तसेच शाळा, अंगणवाडी आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर (आरोग्य उपकेंद्र) यांतील भौतिक गरजा भागवण्यासाठी, या ग्रामसभेत गावातील दोन्ही महसुली गावांतील शाळेंच्या माजी विद्यार्थ्यांना आणि हितचिंतकांना मिशन आपुलकी अंतर्गत आवाहन करण्याचे ठरविण्यात आले असून प्रत्येकी किमान रू. १००/- आणि अधिक रक्कम देणगी रूपाने सर्व माजी विद्यार्थ्यांनी जमा करावी असेही ठरविण्यात आले.
सदर ग्रामसभेत नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय आणि बीटस्तरीय क्रिडा स्पर्धेत वैयक्तीक आणि सांघिक विजेतपद मिळविणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहनपर अभिनंदन करण्यात आले. यावेळी उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या (आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या) समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे मॅडम तसेच आरोग्य सेवक श्री अजय हळये भाऊ उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आरोग्य उपकेंद्रातील अडी-अडचणी, भौतिक गरजा मांडल्या. त्यांवर सुद्धा चर्चा झाली. यावेळी कुष्ठरोग निवारण शपथ सुद्धा घेण्यात आली.
सदर ग्रामसभेत शाळेंतील मुख्याध्यापक, विद्यार्थीं, उपसरपंच सुरज घाडे, सदस्या प्रज्ञा पवार, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, सर्व वाडी प्रमुख, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम तसेच बहुसंख्य ग्रामस्थ स्त्री-पुरुष उपस्थित होते. सरतेशेवटी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडल्या बद्दल सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्वांचे आभार मानून समारोप केला. सदर ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, डाटा आॅपरेटर शाईस दवंडे यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.