(चिपळूण)
चिपळूणमधील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्या वतीने ऑन्को लाईफकेअर चॅम्पियन ट्रॉफी २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधीस डॉक्टर्स मैदानावर उतरले होते. नेहमी हातात स्टेथोस्कोप असलेले हे डॅाक्टर्स मैदानावर चौकार आणि षट्कार मारताना पहायला मिळाले. या सामन्यांच्या माध्यमातून कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती देखील करण्यात आली.
या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी संघाची नावं देखील कर्करोगावर आधारीत होती. या सामन्यांमध्ये सीजीपीए चिपळूण संघ विजयी ठरला असून विजयी टिमला याठिकाणी गौरविण्यात आले. ऑन्को लाईफ केअर चॅम्पियन ट्रॉफी २०२४ मध्ये क्रिकेट सोबतच बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, कॅरम व व्हॅालीबॅाल अशा विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये २५० हुन अधिक डॉक्टरांचा सहभाग होता.
या प्रसंगी लाईफकेअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. इसहाक खतीब, संचालक डॉ. विष्णु माधव, डॉ. समीर दळवी, डॉ. शोएब खतीब, डॉ. नदिम खतीब व डॉ. हुजेफा खतीब आणि ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे कार्यकारी संचालक सचिन देशमुख, डॉ. अमोल पवार, डॉ. सारंग वाघमारे व सीजीपीए चिपळूणचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाजे क्रिडा सचिव डॉ. रणजीत पाटील, डॉ. अरुण पाटील व विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामन्यांच्या समारोप कार्यक्रमास प्रत्येक संघाचे खेळाडू तसेच कॅप्टन देखील उपस्थित होते. या सर्वच स्पर्धांमध्ये सहभागी डॉक्टरांनी मनसोक्त आनंद लूटत खेळाचा आनंद घेतला.