(रत्नागिरी / जिमाका)
23 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ( https://electoralsearch.eci.gov.in/ ) तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहे का हे पहावे. मतदानाच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी मतदान केंद्र ही तपासून घ्यावे. यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी अर्ज क्रमांक 6 भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा तसेच सर्व राजकीय पक्ष यांनीही आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस सहाय्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
यंदा राज्यातील लोकसभा व विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे निर्देशांनुसार मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त कार्यक्रम व घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार 27 ऑक्टोबर 2023 रोजी 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित
प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली व त्यानंतर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 23 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबवण्यात आला.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भर देण्यात आला होता. याकरीता पुनरिक्षण कार्यक्रमापूर्वी आयोगाच्या सूचनांनुसार जुलै ते ऑगस्ट 2023 या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहिम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत जिल्हयातील सर्व मतदार संघात चांगल्याप्रकारे राबविण्यात आली. या सर्वेक्षणात मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार तसेच दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही या कालावधीत पूर्ण करण्यात आली.
दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार 1331493 मतदारांची नाव नोंदणी झालेली होती. यामध्ये अंतिम मतदार यादीनुसार एकूण 25914 मतदारांची वाढ (Addition) झालेली आहे. तर मृत, कायमस्वरुपी स्थलांतरीत व दुबार मतदार अशी मिळूण एकूण 59583 मतदारांची वगळणी करण्यात आलेली आहे. सबब जिल्हयाची दिनांक 23 जानेवारी 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीतील मतदार संख्या 1297824 इतकी झालेली आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांच्या तुलनेत 18 ते 19 या वयोगटामध्ये 7747 (29,89%) मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच 20 ते 29 या वयोगटात 5614 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 5209 होतो. ती 23 जानेवारी 2024 च्या अंतिम मतदार यादीत 12956 इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या 214697 होती, 23 जानेवारी 2024 च्या अंतिम मतदार यादीत 22031 इतकी झालेली आहे. नव मतदार वाढीबाबत मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये राबविलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली दिसून येते.
या पुनरिक्षण कार्यक्रांतर्गत जिल्हयात एकसारखे फोटो असलेले 5005 मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले. तर मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज DSE) 3903
मतदार आढळून आले. त्यांची या कार्यक्रमात सखोल तपासणी करून वगळणी प्रक्रीयेकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकान्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, यापैकी आवश्यक असलेल्या नाव वगळणीच्या प्रक्रीयेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
यंदाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच एप्रिल जुलै व ऑक्टोबर
या बहु अर्हता तारखा ठेवण्यात आलेल्या होत्या त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवांनाही आगावू मतदार नोंदणी (Advance Registration) करता आली आहे. सदर अर्जावर त्या त्या तिमाहीच्या कालावधीत अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व नोंदणी केलेल्या युवांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्दतन (continuous updataion) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्यायुवा ना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.