(संगलट / वार्ताहर)
दापोली तालुक्यातील आडे खाडीत मागील दोन महिन्यांपासून बेकायदेशीर सक्शन पंप लावून भरमसाट वाळू उपसा केला जात आहे. याबाबत दापोली महसूल विभागाला माहिती देऊनही कारवाई करण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे फावले आहे. या वाळू उपशाने आडे पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा वाळू माफियांना बळ देतंय कोण? असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
खाडीकिनारी असणारी वाळू यातील चार घमेल वाळू एखाद्या नागरिकाने नेली तर लगेच महसूल अधिकारी कारवाईचा बडगा उगारतात, मग आडे येथे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी पाठराखण का? असा सवाल देखील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मागील दोन महिन्यात आडे येथे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी करोडो रुपयांचा महसूल बुडवून कित्येक ब्रास वाळू विक्री केली आहे. भर रहदारीच्या मार्गावर सुरू असलेला हा वाळू उपशाचा गोरखधंदा महसूल अधिकारी आणि यंत्रणा बघत असून देखील कारवाई करण्यास धजत नाहीत. त्यामुळे याबाबत आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वाळू उपशाने सावित्री पूल दुर्घटना झाली, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. ही घटना जुनी असली तरी त्या घटनेची आठवण आजही होते. असे असताना दापोली महसूल विभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याचे दिसत आहे. आडे येथील वाळू उपशावर कारवाई करू, बघू, माहिती घेतो, अशी उत्तरे मात्र महसूल अधिकारी यांचेकडून नागरिकांना मिळत आहेत. याबाबत आता खनिकर्म अधिकारी यांनी लक्ष घालून या वाळू उपशावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.