(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मोरारी शिक्षण संस्था मालगुंड चे मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी सात दिवसीय शिबीर वरवडे येथे संपन्न झाले. या सात दिवसाच्या शिबीरात सकाळ सत्रात विशेष संस्कार म्हणून ध्वजारोहण, राष्ट्रगीत, प्रार्थना , सुविचार, बोधकथा, सूर्यनमस्कार व्यायाम प्रकार होत असत.
त्यानंतर श्रमसंस्कारासाठी स्वयंसेवक जात असत. यामध्ये वरवडे गावातील मधलीवाडी येथील नदीवर ३ फूट रुंद ३० फूट लांब असा बंधारा स्वयंसेवकांनी घातला, मिस्त्रीवाडी येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. कुंभारवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या आजूबाजूचा परिसर व चंडिका मंदिराचा परिसराची साफसफाई करण्यात आली.भंडारवाडा येथील समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला.
दुपार सत्रात स्वयंसेवकांवरती व्यावसायिक संस्कार व्हावेत, यासाठी फळ प्रक्रिया उद्योग यावर श्री. अण्णा काणे, पर्यटनावर आधारित उद्योग निर्मिती यावर प्रमोद केळकर शेती व भाजीपाला यावर दिपकआग्रे यांचे मार्गदर्शन झाले. तसेच आरोग्यम् धनसंपदा यावर डॉ. संतोष केळकर, डॉ. स्नेहा साठे यांचे मार्गदर्शन झाले. तद्नंतर पथनाट्य मार्गदर्शन नंदकिशोर रसाळ यांच्या मार्फत, सर्वेक्षण कृती सत्र तसेच वादविवाद इ. स्पर्धा व खेळ घेण्यात आले.
या शिबीराला माजी स्वयंसेवकांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील मान्यवर ग्रामस्थांनी भेटी दिल्या आणि हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मदत केली. या शिबीराच्या समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव व युवा नेते रोहित मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले प्र. प्राचार्य सौ. स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा. सुयोग मोहिते, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा तेजस्वी रेवाळे, शिक्षिका मुंडे,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या शिबीरात एकूण ७० विद्यार्थी सहभागी झाले होते.