(नवी दिल्ली)
महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त 25 रुपये प्रती किलो दराने तांदूळ मिळणार आहे. याआधी केंद्राने भारत नावाच्या ब्रॅण्डचे डाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर ‘भारत’ मार्फत तांदूळ 25 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. सरकारने, या तांदळाची योग्यरीत्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. याआधी या ब्रॅण्डच्या डाळींची आणि पिठाचीही विक्री सुरू करण्यात आली आहे.
भारत नावाच्या ब्रॅण्डचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीला एका वरिष्ठ अधिकार्याने दुजोरा दिला. नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल. केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापार्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ 25 रुपये प्रती किलो या दराने उपलब्ध करून देत आहे. मात्र, बासमती तांदळाचे भाव 50 रुपये किलोवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करून ठेवणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करून भाव वाढवणार्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे.
केंद्र सरकारने लाँच केला होता ‘भारत आटा’
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 27.50 रुपयांमध्ये मिळणारा ‘भारत आटा’ लाँच केला होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 6 डिसेंबरला दिल्लीत हा आटा लाँच केला होता. भारत नावाच्या ब्रॅण्डचे पीठ सध्या 10 आणि 30 किलोंच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. तांदळाप्रमाणेच आटाही नाफेड आणि एनसीसीएफ आणि इतर सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी सरकारकडून अडीच लाख मेट्रिक टन गहू सरकारी संस्थांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.