जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. सृष्टीपूर्वी ब्रह्म होते त्यावेळेला सृष्टी नव्हती. आता सृष्टी दिसत आहे ती सत्य आहे की खोटी आहे? तुम्ही सर्वज्ञ गोसावी आहात माझी शंका फेडावी. असे श्रोत्याने वक्त्याला विचारले. आता याचे उत्तर देत आहे ते ऐकावे असं उदार वक्ता बोलू लागला. जीवभुत: सनातन असं गीतेच वचन आहे. या वाक्याने सृष्टीला सत्यपणा आलेला आहे. यद्दृष्ट्म तन्नष्टम जे दिसते ते नासते. या वाक्यामुळे सृष्टी मिथ्या आहे असे दिसते. सत्य मिथ्या कसे निवडावे? सत्य म्हटलं तरी नष्ट होतं, मिथ्या म्हटलं तरी दिसतं. आता जस आहे तसं सांगा. सृष्टीमध्ये अनेक लोक दिसतात अज्ञानी आणि सज्ञानी, त्यामुळे समाधान होत नाही. अज्ञानी लोकांच्या मताने सृष्टी शाश्वत आहे. देवधर्म तीर्थ व्रत सत्य आहे असं सांगून सर्वज्ञाचा राजा मूर्खाच्या प्रतिमा पूजतात. ब्रह्म प्रळयाबाबतच्या पैजा घातल्या जातात. तेव्हा त्याने विचारले हे अज्ञान आहे, मग संध्या स्नान का करतात? गुरु भजन तीर्थाटन करीत का फिरायचे? सद्गुरूची उपासना करावी असे गुरुगीतेमध्ये शंकराने सांगितले आहे. गुरु चे भजन कसे करावे? त्याला कसे ओळखावे? विचारपूर्वक त्याच्याकडून मार्गदर्शन कसं घ्याव? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्तिं
द्वंद्वातितं गगन सदृशं तत्वमस्यादीलक्ष्यं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षी भूतं
भावातीतं त्रिगुण रहितम सद्गुरुं तं नमामि
असे गुरुगीतेचे वचन आहे. सद्गुरुचे ध्यान असे आहे. सृष्टी मिथ्या आहे हे भान कसे निर्माण होईल? असं प्रश्न विचारला असता गुरूला ओळखले की सृष्टी मिथ्या असा निश्चित अर्थ केला. हे श्रोत्याने मानले नाही, आणि विवाद करायला लागला. गोविंदा हे अज्ञान कसे रे? जीव भूता सनातन, असे गीतेचे वचन आहे, त्याला तू अज्ञान कशाला म्हणतोस? असा श्रोता आक्षेप घेतो, त्याने मनामध्ये दुःख निर्माण झाले, त्याचे प्रत्युत्तर सावधपणे ऐकावे.
गीतेमधील गोविंदाने सांगितले, त्याचा भेद तुला समजत नाही म्हणून खेद वाटतो. आपली विभूती पिंपळ आहे म्हणून गोपाळाने सांगितले, हा वृक्ष तोडला की लगेच तुटतो. आणि गीतेत तर म्हटले आहे, मी शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्यामध्ये भिजत नाही असं माझं स्वरूप आहे. पिंपळ शस्त्राने तुटतो. पाण्याने भिजतो. अग्नीने जळतो. आता तो नाशवंत आहे. तुटतो, जळतो, बुडतो, तर ऐक्य कसे घडते? म्हणून हे सद्गुरूच्या मुखातून स्पष्ट करावे. मी इंद्रियांमध्ये मन आहे, असं कृष्ण सांगतो मग चंचल मनाची उर्मि का आवरायची? असं कृष्ण का बोलला? त्यांनी ओनामा शिकविला, साधनामार्ग दाखविला मग असे का? हा वाक्यातील भेद आहे.
गोविंद सर्व जाणतो. देहबुद्धीचा वाद उपयोगी नाही. वेद, शास्त्र, श्रुती, स्मृती यामध्ये वाक्यभेद निर्माण होतात, तेव्हा सद्गुरूचे वचन हे प्रमाण मानावे लागते. वेदशास्त्र यांचे भांडण शस्त्राने तोडणारा असा कोण आहे? हे साधूशिवाय दुसरा कोणीही कल्पांती सांगू शकत नाही! पूर्वपक्ष आणि सिद्धांत याचे संकेत शास्त्रात देतात त्याचा निश्चित असा अर्थ अधिकारी साधूकडूनच ऐकावा. अन्यथा एका प्रश्नाची एकापेक्षा एक थोर उत्तरे वेद शास्त्रात सापडतात. म्हणून वाद-विवाद सोडून ब्रह्मानंदाचा स्वानुभव येईल असा संवाद करावा! अशी माहिती श्री समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत पुढील कथा ऐका पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127