(नाशिक / प्रतिनिधी)
प्रभू रामचंद्रांकडे श्री रामदास स्वामींनी अभेद्य भक्ती मागितली,त्याच प्रकारे सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे अभेद्य भक्ती मागावी असा उपदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांनी केला.
सेवामार्गतर्फे श्री दत्त जयंती सप्ताह अत्यंत श्रद्धापूर्वक आणि उत्साही वातावरणात सुरू झाला असून गुरुवारी परमपूज्य गुरुमाऊलींचे नाम सप्ताह निमित्त विशेष हितगुज झाले. यावेळी गुरुमाऊली श्री.मोरे यांनी गुरुचरित्र ग्रंथ, त्यामधील लीला, दत्त महाराजांचे आविष्कार याविषयी सेवेकरांना मार्गदर्शन केले. गुरुमाऊली श्री.मोरे म्हणाले की, दत्त महाराजांचा पूर्ण अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पिठापूर ही जन्मभूमी तर कुरवपूर ही कर्मभूमी राहिली आहे. बिघडलेली तत्कालीन अध्यात्मिक घडी पूर्वपदावर आणण्याचे काम श्रीपाद श्रीवल्लभ यांनी केले.त्यांच्यानंतर श्री नृसिंह सरस्वती यांनी संपूर्ण देशभरात धार्मिक कार्य केले.त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी संपूर्ण देशभरात पायपीट करून अनेक सिद्ध पुरुष निर्माण करून त्यांच्याद्वारे राष्ट्रहिताचे काम केले. आजही स्वामी महाराजांच्या अविष्कार सुरू असून आहे. सन ११४९ साली पंजाब जवळच्या छेली खेडा गावी धरणीमाता दुभंगून श्री स्वामींची आठ वर्षीय बालक मूर्ती प्रकटली. आजही त्यांचे कार्य जोमाने सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
आज आपण श्रीमद गुरुचरित्र सप्ताह करीत आहोत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूरमध्ये अजोड कार्य केले.गुरुचरित्रातील 48 अध्याय ज्या जागेत घडला त्याच जागेवर आज दत्तपीठ उभे राहिले आहे, याकडे त्यांनी सेवेकरांचे लक्ष वेधले. आपल्यातील अहंकार जाण्यासाठी गाणगापूरमध्ये पाच घरे माधुकरी मागावी असे सांगतानाच जनतेची दुःखे स्वीकारण्यासाठी दत्त महाराजांनी झोळी घेतली आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.