(ठाणे)
घोडबंदर रोड येथे वादावादीनंतर तरुणीला शिवीगाळ आणि बेदम मारहाण करणारा तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांना रविवारी रात्री कासारवडवली पोलिसांनी अखेर अटक केली. या प्रकरणातील गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारदेखील ठाणे पोलिसांनी जप्त केली. आरोपी हा एमएसआरडीसीचे संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. त्यांचे राजकीय लागेबंध असल्याने पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे.
एमएसआरडीच्या संचालकाच्या मुलासह त्याच्या मित्रांनी हे कृत्य केल्याची तक्रार पीडितेने दिली असून या घटनेला तब्बल एक आठवडा उलटूनही पोलिस तपासात गती नसल्याने विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर रविवारी रात्री ठाणे पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या आरोपींना रविवारी रात्री ८.५३ वाजण्याच्या सुमारास अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर कार तपासासाठी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास कासारवडवली पोलिस करीत आहेत.
दरम्यान, या पीडित तरुणीची भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाण्यातील खासगी रुग्णालयात रविवारी आले होते. त्यांनी तरुणीशी संवाद साधल्यानंतर पीडितेला लवकरात लवकर न्याय द्या अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरून जाब विचारू, असा इशारा दानवे यांनी दिला. सोशल मीडिया स्टार असलेल्या पीडितेला ११ डिसेंबर रोजी तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याने ओवळा येथे भेटायला बोलावले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अश्वजितने तिला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. तिच्या हाताचाही चावा घेतला. गायकवाड याच्या रोमील पाटील व सागर शेळके या मित्रांनी पीडितेला गाडीने धडक दिल्याचे तिने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.
रविवारी रात्री या प्रकरणातील आरोपी अश्वजित गायकवाड, रोमील पाटील, सागर शेळके या तिघांना पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांनी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली. या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्य समोर आल्यास पुढील कलमांचा समावेश केला जाईल, असे सिंह यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.