(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सरकारी-निमसरकारी कार्यालयात ५० टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत.एका अधिकाऱ्यावर दोन-दोन, तीन-तीन तालुके, आस्थापनांचा भार सोपविला जात आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असून नागरिकांची कामेही त्यामुळे प्रलंबित राहू लागली आहेत. एका कामासाठी दहा- दहावेळा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
शासकीय,निमशासकीय कार्यालयातील या अनागोंदी कारभाराचा थेट पंचनामाच माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला आहे.शहरातील एका शासकीय कार्यालयात’रिकाम्या’ खुर्चीसमोर अधिका-यांची वाट पाहत बसलेल्या मुकादम यांनी रिक्त पदांचा विषय आपल्या ‘स्टाईल’ने जनतेसमोर आणला आहे. ‘शासकीय कार्यालयात खुर्च्छा खाली आणि कशासाठी हवे शासन आपल्या दारी’, असा सवाल करीत त्यांनी राज्य सरकारला चिमटाही काढला आहे.
महाराष्ट्र शासन ‘शासन आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम राबवित आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी कमी आहेत. उदा.महामार्ग विभागात २९,चिपळूण तहसीलदार कार्यालयात तलाठीसह ३२,चिपळूण पंचायत समिती ग्रामसेवकासह ४०,चिपळूण तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात कृषि सेवकासह १९,चिपळूण आरोग्य विभागात ४८, सार्वजनिक बांधकाम विभागात २०,पाणी पुरवठा विभागात १०, पशुसवंर्धन खात्यात तर एक अधिकारी एक शिपाई,चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये ३०,चिपळूण नगर पालिकेत १८,पाटबंधारे विभागात ८,विद्युत मंडळात १४० पदे रिक्त असल्याची विदारक स्थिती आहे.जवळ-जवळ रत्नागिरी जिल्हयामध्ये हजार ते बाराशे जबाबदार कर्मचारी कमी आहेत.मग असे असताना राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ ही योजना कशी राबवणार?, असा सवालही शौकतभाई मुकादम यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत ते म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या योजनेला राजकीय स्वरुप देणे योग्य नाही. महाराष्ट्र राज्यातल्या काही ठिकाणी ही योजना राबविण्यासाठी मोठ-मोठ्या सभा घेतल्या जात आहेत. त्याला राजकीय स्वरुप दिले जात आहे. त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांनी राजकीय भाष्य करता कामा नये. लोकाभिमुख योजनांवर त्यांनी भाषणे करावीत. शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये जे अधिकारी,कर्मचारी कमी आहेत त्यामध्ये सरकारने बेरोजगारांची भरती करुन बेरोजगारांना न्याय द्यावा’, अशी मागणीही श्री. मुकादम यांनी केली आहे.