( चिपळूण )
तालुक्यातील सवतसडा धबधब्याच्या खडकात चैतन्या मेटकर या विवाहितेचा मृतदेह आढळला होता. मात्र, हा घातपात की, आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. पोलिसांना आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा असून, तो प्राप्त होताच मृत्यूचे कारण उलगडेल.
महामार्गाच्या चौपदरीकरणातील एका कामगाराला सोमवारी (४ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता परशुराम सवतसडा येथील धबधब्याच्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह दिसला. प्रथमदर्शनी मृतदेहाचे केवळ पाय बाहेर दिसत होते. तर शरीर खडकात कोंबलेल्या अवस्थेत होते. पोलिस तपासानंतर हा मृतदेह पेढे पायरवाडी येथील चैतन्या चंद्रकांत मेटकर या विवाहितेचा असल्याचे स्पष्ट झाले. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
मृतदेहावर काही किरकोळ जखमा आहेत. त्यामुळे ती पाय घसरून खडकात पडली असावी आणि नंतर तिला उठताच आले नसावे, असाही कयास लावला जात आहे. मृतदेहाच्या ठिकाणी हातातील बांगड्या फुटून पडलेल्या स्थितीत आढळल्या होत्या. नेमके काय झाले, ती धबधब्याच्या ठिकाणी का गेली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर न आल्याने पोलिसही कोणत्याच निष्कार्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण पूर्णपणे स्पष्ट न झाल्याने आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे.
पोलिसांच्या तपासाला गती
चैतन्या ही आपल्या सासरच्या लोकांबरोबर येथे राहत होती. तिचा पती मुंबई येथे नोकरीला आहे. मृत्यूच्या एक दिवस अगोदर माहेरला जाते, असे सांगून ती घरातून निघाली होती. विशेष म्हणजे आपला मोबाइल तिने घरातच ठेवला होता. माहेरला जाताना तिने मोबाइल सासरी का ठेवला, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करून तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.