(गुहागर)
तालुक्यातील बोऱ्या फाटा येथे काही दिवसापूर्वी दोन तरुणांमध्ये झालेल्या वादावादीमध्ये सचिन पोळेकर नामक व्यक्तीने संकेत पाटील या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने गंभीर प्रहार केला होता. या घटनेमध्ये संकेत पाटील गंभीररित्या जखमी झाला होता.
ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सचिन पोळेकर हा पोलिसांपासून नजरेआड राहिला होता. मात्र गुहागर पोलिसांना सचिन पोळेकर याला पकडण्यात यश आले. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३२६, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सचिन पोळेकर यांची चिपळूण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायलायकडे आरोपीची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केली होती. आरोपीच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. ॲड. संकेत साळवी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून चिपळूण न्यायालयाने आरोपी सचिन पोळेकर याची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या केसमध्ये ॲड. संकेत साळवी यांना त्यांचे सहकारी ॲड. अलंकार विखारे, ॲड. रिया कोळवणकर व ॲड. पूजा माळी यांनी मदत केली.