(लांजा)
रानात चरायला गेलेल्या गीर गायीच्या पाडीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील बापरे तेलीवाडी येथे घडली आहे.
बापरे गावातील तेलीवाडी येथील शेतकरी मोहन साळुंखे यांनी नेहमीप्रमाणे आपली गुरे रानात चरायला सोडली होती. शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याने या गुरांपैकी एका गीर गायीच्या पाडीवर हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बिबट्याने हल्ला केल्यानंतर जनावरांचा आरडाओरडा ऐकून मालक मोहन साळुंखे त्या ठिकाणी धावत गेले. त्यानंतर बिबट्याने तिथून पलायन केले. यामध्ये मालक मोहन साळुंखे यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान भर दिवसा बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे बापेरे तेलेवाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून केली जात आहे.