(चिपळूण / ओंकार रेळेकर)
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयालय आयोजित ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे २५ नोव्हेंबरपासून होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत व अन्य मान्यवरांना उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या स्पर्धेला चिपळूणसह जिल्ह्यातील रसिकांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे समन्वयक, अभिनेते नंदू जुवेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाट्य संयोजक सुनील जोशी हेही या वेळी उपस्थित होते. या वेळी जुवेकर यांनी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आयोजनाबाबत नियमांबाबत पत्रकारांना सविस्तरपणे माहिती दिली.शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यासाठी तिकिटाचे दर फक्त १५ रूपये, दहा रुपये असे ठेवण्यात आले आहेत.
केदार देसाई लिखित, प्रसाद धोपट दिग्दर्शित कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघामार्फत दि. २५ नोव्हेंबरला ‘अशुद्ध बीजापोटी’ हे नाटक सादर केले जाईल. डॉ. शंकर शेष लिखित संतोष सारंग दिग्दर्शित कुणबी कर्मचारी सेवा संघ रत्नागिरी यांच्यामार्फत ‘कोमल गंधार’ नाटक दि. २६ नोव्हेंबरला सादर केले जाईल. कै. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान चिपळूण यांच्या मार्फत आनंद खरबस लिखित, अभिजित काटदरे दिग्दर्शित ‘परीघ’ नाटक दि. २७ नोव्हेंबरला सादर केले जाणार आहे.
चंद्रशेखर मुळ्ये लिखित, दिग्दर्शित राधाकृष्ण कलामंच रत्नागिरी यांच्यामार्फत दि. २८ नोव्हेंबरला ‘दॅट नाईट’ नाटक सादर केले जाणार आहे. चैतन्य सरदेशपांडे लिखित, ओंकार रसाळ, गणेश राऊत दिग्दर्शित सहयोग रत्नागिरी यांच्यामार्फत ‘लॉलीपॉप’ नाटक दि. २९ नोव्हेंबरला सादर केले जाईल. गंगाराम गवाणकर लिखित, चंद्रकांत कांबळे दिग्दर्शित संकल्प कलामंच रत्नागिरी यांच्यामार्फत ‘वाटेला सोबत हवी’ हे नाटक दि. ३० नोव्हेंबरला सादर केले जाणार आहे. प्रसाद पंगेरकर लिखित, दिग्दर्शित श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ जानशी यांच्यामार्फत दि. १ डिसेंबरला ‘फूर्वझ’ हे नाटक सादर केले जाईल. निलेश जाधव लिखित, अमित इंदुलकर दिग्दर्शित श्री विठ्ठल रूक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत दि. २ डिसेंबरला ‘सात-बारा’ हे नाटक सादर केले जाईल. राजश्री साने लिखित, भाग्यश्री खरे दिग्दर्शित श्रीरंग रत्नागिरी यांच्यामार्फत दि. ३ डिसेंबरला ‘तथास्तु’ हे नाटक सादर केले जाणार आहे. प्राथमिक फेरीतील सर्व नाटके दररोज सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे समन्वयक, अभिनेते नंदू जुवेकर यांनी केले आहे.
फोटो : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाट्य संयोजक सुनील जोशी आणि नंदू जुवेकर छायाचित्रात दिसत आहे
(छाया : ओंकार रेळेकर)