(पुणे)
राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवलं असताना दुसरीकडे लेखक नामदेवराव जाधव सातत्याने शरद पवारांना टार्गेट करत होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांना ओबीसीत न टाकता इतर समुदायाला ओबीसीत समावेश करण्याचा जीआर काढला होता. त्यामुळे मराठ्यांचे नुकसान झाले. इतकेच नाही तर शरद पवार हे मराठा नसून ओबीसी आहेत असं जाधवांनी म्हटलं होते. यावरून संतापलेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधवांवर हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळं फासले आहे.
पुण्यात नामदेवराव जाधव माध्यमांशी बोलताना हा प्रकार घडला. शरद पवारांवर चुकीचे विधान केले म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासले. यापुढे पवारांविरोधात जो बोलेल त्यांना आम्ही सोडणार नाही असं संतप्त कार्यकर्त्यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना काळे फासले. त्यावेळी एका पोलिसाने जाधवांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी बळजबरीने जाधवांना काळे फासले. यावेळी जमलेल्या कार्यकत्यांनी जाधव यांच्या विरोधात घोषणबाजी केली. राष्ट्रवादी जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा देखील त्यांच्याकडून देण्यात आल्या.
या आंदोलनापूर्वी जाधव आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यात विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. मी कागद दाखवतो, हे दंडुके दाखवतात. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असं तुमचे नेते सांगतात, जर तुमच्या हातून असं कृत्य घडलं तर तुमच्या नेत्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल. जिजाऊंच्या वंशजाच्या तोंडाला काळे फासलं म्हणून तुम्हाला कदाचित यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेष उपोषणाला बसावं लागेल असा इशारा नामदेवराव जाधवांनी दिला होता.