(खेड / भरत निकम)
तालुक्यातील वडगांव बुद्रुक येथे सन २०१८/१९ साली जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमातून सिमेंट बंधारा बांधून २१ लाख ९५ हजार ६१३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दर्जाहीन कामामुळे पहिल्या पावसात बंधारा वाहून गेला. या कामाच्या चौकशीसाठी स्थानिक ग्रामस्थ, मुंबई पुणे शहरातील चाकरमानी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करीत निवेदन सादर केले. वेळप्रसंगी उपोषणही करण्यात आले. मात्र जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद अधिकारी, आणि स्थानिक पातळीवरचे अधिकारी यांनी ठेकेदार व दोषी अधिकारी यांना पाठीशी घातले आहे. उपोषण केलेल्या गावकऱ्यांना चौकशी अहवाल देतो, असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा ते दिले नाही. या चौकशी कामात उपोषण करणारे गावकरी यांची वेळोवेळी फसवणूक करुन चेष्टा केली आहे. वडगाव बुद्रुक येथील अनेक ग्रामस्थांनी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थलांतर केले आहे. मात्र भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांना सर्वांनी पाठीशी घातले आहे, असा गंभीर प्रकार येथे घडलेला आहे.
४९ लाख खर्चाचा नवीन बंधारा
सन २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवार कार्यक्रमातून उभारलेला बंधारा वाहून गेला आहे. उपोषण करणारे गावकरी यांना हा चौकशी अहवाल मिळाला नाही. मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताना ४९ लाखांचा नवीन बंधारा मंजूर करण्यात आला आहे.
वडगाव बुद्रुक कुंभा येथे भुमीपूजन
वडगाव बुद्रुक कुंभा या ठिकाणी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग ४९ लाख खर्च करुन नवीन बंधारा उभारणार आहे. हा भूमीपूजनाचा कार्यक्रम रविवारी, १९ रोजी सकाळी १० वाजता होणार असून मुंबई पुणे चाकरमानी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
फोटो : खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील कुंभा भागात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहुन गेलेला बंधारा दिसत आहे.