(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी नं. १ केंद्र शाळेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार्यानुभवांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारची उटणे व पणत्या रंगवण्याचा विशेष उत्पादक उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत उठणे आणि रंगवलेल्या पणत्या लक्षवेधी ठरल्या आहेत.
केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार ,श्री.उपशिक्षक रामदास चव्हाण, श्री.गणपती पडुळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रथम प्रात्यक्षिके करून दाखवली. वस्तूंची कृती अवगत करून विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या आधारे सुगंधित उटणे आणि पणत्या रंगवण्याचा उपक्रम अतिशय आवडीने पूर्ण करण्यासाठी हिरीरिने सहभाग घेतला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यातून साकार झालेल्या सुगंधी उटणे व रंगवलेल्या पणत्या यांना परिसरातील ग्रामस्थ व पालकांकडून मागणी आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच वस्तू तयार करण्याचे कौशल्य अवगत झाल्याने पालकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
लघु उद्योगाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कौशल्यवान वस्तू विद्यार्थ्यांनी विक्री केल्या तर कौशल्याच्या आधारे विद्यार्थी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने भविष्यात पाऊले उचलू शकेल, असा आशावाद पालकांनी व्यक्त केला. सुगंधीत उठणे व रंगवलेल्या पणत्या यांची प्रदर्शन पाहिले असता ग्रामस्थ ,पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ यांच्यावतीने मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच वस्तू तयार केलेल्या विद्यार्थ्यांचे खास अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू अनेक ग्रामस्थांनी खरेदी केल्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच प्रेरणा मिळत आहे. अशाच प्रकारचे उपक्रम शिक्षकांकडून राबवण्यात यावेत, अशा प्रकारचे आवाहन पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. या उत्पादक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा सुखद अनुभव घेतला.