(खेड / भरत निकम)
मुंबई गोवा महामार्गाने कोकणच्या विकासाला चालना मिळेल. परंतु देश चालवणारे सरकार महामार्गाच्या कामात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारला पुन्हा सत्तेवर बसण्याचा नैतिक अधिकार राहीलेला नाही. या राष्ट्रीय महामार्गाचे झालेले काम हे दर्जेदार झाले नसल्याचे चिपळूण येथील पुल कोसळल्याच्या घटनेवरुन अधोरेखीत झाले आहे. हेच कारण केंद्रातील सत्ताधाऱ्यांंची सत्ता उलथवून लावेल, असा टोला केंद्रीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दिशेने माजी केंद्रीयमंत्री व शिवसेना उबाठागटाचे नेते अनंत गीते यांनी लगावला आहे.
कोकण पदवीधर मतदार संघातील बैठकीच्या नियोजनाकरिता ते खेड येथे आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबई गोवा महामार्ग हा कोकणचा समृद्धीचा मार्ग आहे. खरं तर केंद्रातील सरकारने प्राधान्यक्रमाने महामार्ग पूर्ण करुन घ्यायला हवा होता. मात्र, कोकणकडे आणि कोकणी जनतेकडील दुर्लक्ष केलेल्या केंद्र सरकारने भ्रष्ट आणि निकृष्ट दर्जाचा नमुना तयार केला आहे. चिपळूण बहाद्दूरशेख नाका येथील पुल कोसळलेल्या घटनेवरुन पुन्हा एकदा चूकीची कामे झाली असल्याचे समोर आले आहे, असेही माजी खासदार गीते यांनी चिपळूण मधील घटनेबद्दल टीका करताना केंद्रातील मोदी सरकारवर चुकीचे काम केल्याचा आरोप केला आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख सचिन कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह शिवसेना उबाठागटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.