(राजापूर)
दारूच्या नशेत चुलत्याने पुतण्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता कोतापूर – चर्मकारवाडी येथे घडली. या मारहाणीत प्रकाश पुनाजी कोतापकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जितेंद्र गुणाजी कोतापकर याला पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी जितेंद्र गुणाजी कोतापकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र व प्रकाश हे नात्याने चुलते पुतणे असून, त्यांच्यात गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. रविवारी सायंकाळी जितेंद्र दारू पिऊन आला होता. त्याने प्रकाश कोतापकर यांना दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत प्रकाश कोतापकर यांनी विचारणा केली असता त्याने लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.
जितेंद्र कोतापकर यांच्याविरोधात पोलिस स्थानक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र, या तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकाश कोतापकर यांच्या नातेवाइकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश कोतापकर यांची चारचाकी गाडीही फोडण्यात आली होती. त्याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा जीवघेणा हल्ला झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
या मारहाणीत प्रकाश कोतापकर यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.