( गणपतीपुळे/वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेतील बळीराम परकर विद्यालयापासून मराठवाडी ते निवेंडी- चाफेकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची गेल्या कित्येक दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून हा रस्ता डांबरीकरण असल्याने गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली आहे. तसेच काही ठिकाणी डांबर पूर्णतः उखडली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
या मुख्य रस्त्यावरुन नेहमीच लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. याच मुख्य मार्गावरून मालगुंड येथील जोशी वाडी मराठवाडी, तळेपाट, ब्रह्मटेकवाडी, सुतारवाडी, तेलीवाडी, आडी, आग्राडी, दुर्गवळीवाडी, अवचितवाडी, धावडेवाडी या भागातील शालेय विद्यार्थ्यांची नेहमी ये-जा सुरु असते. म्हणून रहदारीच्या व वाहतुकीच्या दृष्टीने हा मुख्य मार्ग असतानाही या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही लक्ष दिले जात नसल्याने मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच याच रस्त्यावरून गावातील प्रमुख लोकप्रतिनिधींची वाहने देखील जात असतात. परंतु सर्वच लोकप्रतिनिधींचे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याव्यतिरिक्त येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मालगुंड तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून त्यांनी मालगुंड ग्रामपंचायतीला वारंवार याची कल्पना दिली आहे. तसेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे देखील याची माहिती कळीत केली होती. परंतु अद्याप याबाबत कुठलीही कार्यवाही होत नसल्याने आपण या रस्त्याची दुरुस्ती यापुढील काळात न झाल्यास तीव्र आंदोलनाच्य देखील तयारीत असल्याचे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे, अन्यथा या रस्त्याकडे दुरुस्तीकडे खऱ्या अर्थाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.