(खेड)
खेड तालुक्यात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील बंद स्थितीत असलेल्या स्केपटर केमिकल्स लिमिटेड या कंपनीत काल दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. सोमवार असल्याने वीजप्रवाह खंडित असताना लागलेल्या आगीमुळे संशय व्यक्त केला जात आहे. तर ऑक्टोबर हिटमुळे रसायनाने पेट घेतला असावा अशीची चर्चा घटनास्थळी होती. स्केपटर ही कंपनी बंद स्थितीत असताना या कंपनीत इतकी मोठी आग कशी लागली? यात नक्की कोणत्या स्वरूपाच्या केमिकलने पेट घेतला? असे अनेक प्रश्न परिसरातील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान लागलेली आग दुपारी ३ वाजता आटोक्यात आली. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त कळताच वसाहतीतील अग्निशमन दल, खेड नगर परिषदेचा बंब, परिसरातील खासगी पाण्याचे टँकर यांच्या मदतीने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कंपनीतील यंत्र सामुग्री व इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच लोटे पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
या आगीमध्ये लोटे अग्निशमन दलाचे फायरमन खेडेकर यांच्या नाकातोंडात गॅस गेल्याने ते गुदमरले होते. त्यांना तात्काळ लोटे येथील परशुराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. केमिकल ड्रमचे स्फोट झाल्याने आग आटोक्यात येण्यास अडचण येत होती.